Monday, December 23, 2024

/

रेल्वे जी एम कडे बीसीसीआयची ही मागणी

 belgaum

बेळगाव ते कराड या संकेश्वर, निपाणी मार्गे जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या उभारणीला प्राधान्य देण्याबरोबरच अन्य विविध मागण्यांचे निवेदन बेळगाव चेंबर ऑफ इंडस्ट्रीजतर्फे (बीसीसीआय) आज शुक्रवारी नैऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सादर करण्यात आले.

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रोहन जुवळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज बेळगाव रेल्वे स्थानक येथे नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांची भेट घेतली. तसेच आपल्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. याप्रसंगी चेंबरचे सेक्रेटरी प्रभाकर नागरमुन्नोळी, कर समितीचे चेअरमन राजेंद्र मुगेकर आणि आयसीडी प्रमुख नीलिमा शेवडे उपस्थित होते. यापूर्वीच सर्वेक्षण झालेल्या बेळगाव ते कराड या संकेश्वर निपाणी मार्गे जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या उभारणीला प्राधान्य दिले जावे. ज्यामुळे मुंबई ते बेंगलोर दरम्यानचा संपूर्ण औद्योगिक क्षेत्र एकमेकांशी जोडला जाईल. रेल्वे प्रशासनाने व्यापारी आणि उद्योजकांना माहिती देऊन त्यांनी रेल्वे मालवाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी आवाहन करावे. रेल्वे सेवा, रेल्वे वेळापत्रक, प्रवाशांच्या सुविधांबाबतीतील सुधारणा आदींची माहिती चेंबरला देण्यात यावी.

निजामुद्दीन एक्सप्रेसला बेळगाव येथून शयनयान (स्लीपर कोचेस) आणि मिलिटरी डबा (बोगी) जोडला जावा. हैदराबाद, तिरुपती आणि चेन्नईला जाणाऱ्या रेल्वेसाठी देखील ही सोय करण्यात यावी. दिव्यांगांसाठी बँक पेपर तिकीट वितरण सुविधा उपलब्ध करून द्यावी. शहरातील नियोजित 5 रेल्वे ओव्हर ब्रिजपैकी दोन ब्रिज पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या रेल्वे गेट येथील ब्रिजचे काम सुरू असून रेल्वे अधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार ते जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. तेंव्हा उर्वरित दोन रेल्वे ओव्हरब्रीजचे काम लवकरात लवकर सुरू करावे.Bcci swr gm

नाशवंत आणि अनाशवंत कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठीही खास रेल्वे सुरू करण्यास प्राधान्य द्यावे. बेळगाव रेल्वे स्थानकावर जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक कारची सोय करावी. रेल्वे प्लॅटफॉर्मवर सुसज्ज मेडिकल स्टोअर्स सुरू करावे. तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी नाण्यांवर चालणारे प्लॅटफॉर्म तिकीट व्हेंडींग मशीन बसवावे. प्लॅटफॉर्मवर विशेष करून प्लॅटफॉर्म क्र. 1 वरील आसन व्यवस्था वाढवावी. सध्याच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सुविधांमध्ये सुधारणा करण्यात यावी. प्लॅटफॉर्मवर 24 तास पुरेशा महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी.

रेल्वे चौकशी आणि कस्टमर केअरसाठी स्वतंत्र बूथ उभारण्यात यावा. टॅक्सी आणि ऑटोरिक्षा यांचे प्रीपेड काऊंटर पोलिसांच्या नियंत्रणाखाली चालविण्यात यावेत, या मागण्या बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत.यावेळी राजेंद्र मुतगेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.