Monday, November 18, 2024

/

*आठवणीतील बाबासाहेब….*

 belgaum

एकेकाळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानं ज्यावेळी बेळगावातील युनियन जिमखान्यावर झाली, त्यावेळी त्याचे वृत्तांकन माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी त्याकाळी केले होते. बाबासाहेब ज्या -ज्या वेळी बेळगावला येत त्यावेळी मालोजी अष्टेकर त्यांची आवर्जून भेट घेत असत. आज पहाटे बाबासाहेब पुरंदरे यांचे देहावसान झाल्यानंतर मालोजीराव अष्टेकर यांच्या शब्दात ‘आठवणीतील बाबासाहेब’….

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे निधन झाले आणि गेल्या 50 वर्षातील इतिहास आठवून गतस्मृती झाल्या. 1974 साली त्यांची बेळगावात शिवचरित्रावर व्याख्याने झाली आणि त्या व्याख्यानांमुळे बेळगावसह आसपासचा सारा परिसर शिवमय होऊन गेला होता. बाबासाहेब यांचे व्याख्यान रात्री 9:30 वाजता सुरू व्हायचे, मात्र त्याआधीच युनियन जिमखानाचे मैदान श्रोत्यांनी फुलून गेलेले असायचे. व्याख्यानाला वेळेवर सुरुवात व्हायची आणि बाबासाहेबांची ओघवती वाणी सुरू झाली की, श्रोते मंत्रमुग्ध होऊन जायचे. बेळगाव आणि परिसरातील गरिबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत शिवभक्त या आनंद यात्रेत सहभागी झालेले असत. एवढा मोठा जनसमुदाय परंतु कुठेही गडबड गोंधळ नसायचा.

बेळगाव बाहेरून आलेल्या श्रोत्यांची विविध प्रकारची वाहने शिस्तबद्ध पद्धतीने लावलेली असल्यामुळे व्याख्यान संपल्यानंतरही कोणताही गोंधळ नसायचा. शिवचरित्रातील अत्यंत बारीक-सारीक तपशिलासह सांगितलेला इतिहास, सणावळी आणि मुस्लिम राज्यकर्त्यांची नेमकी नांवे त्यांचा नेमका उच्चार या सार्‍यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे नेमके मोठेपण जनमानसावर ठसविणे हे त्यांनाच शक्य होते.

त्यांच्या एका व्याख्यानमालेचे वार्तांकन करण्याची संधी मला मिळाली होती हे मी माझे भाग्य समजतो. व्याख्यानातील इसवी सन आणि नांवे याच्यात चूक होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी रात्रभर कॅसेट ऐकून भाषणाचा वृत्तांत तयार करण्याची मोठी कसरत करावी लागत होती. ते मोठे त्रासदायक होते. मात्र त्याचा आनंद अवर्णनीय होता. आपल्या व्याख्यानाद्वारे जसे शिवचरित्र घराघरात पोचवण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. तसेच काम शिवचरित्र कमी किंमतीत शिवभक्तांना देऊन केले.Purandare bgm visit

400 रुपयांचे पुस्तक 100 रुपये इतक्या स्वागत मूल्यात देऊन अक्षरशः प्रत्येक घराघरात शिवचरित्र जाईल असा आटोकाट प्रयत्न बाबासाहेबांनी केला. बेळगावच्या शिवप्रेमींनी देखील त्याला तितकाच मोठा प्रतिसाद दिला.

व्याख्यान आणि पुस्तकाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मराठी माणसाच्या घरापर्यंत नेत असतानाच बाबासाहेबांनी ‘जाणता राजा’ द्वारे शिवाजी महाराज छोट्या बालकापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. बेळगावात जाणता राजाचे दोन वेळा प्रयोग झाले आणि प्रतिसादही प्रचंड मिळाला. या प्रयोगांमधून महाराजांचे मोठेपण नेमकेपणाने प्रेक्षकांसमोर मांडले गेले. या प्रयोगांमुळे बेळगावातील अनेक लहान मोठ्या कलाकारांना काम करण्याची संधी मिळाली होती. माजी नगरसेवक कै. अशोक नारायण पाटील (चव्हाट गल्ली) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. शेकडो कार्यकर्ते अक्षरशः आपल्या घरातील कार्य समजून या प्रयोगांवेळी राबत होते. या प्रयोगानंतर अनेक कार्यकर्त्यांना संयोजकांनी दिलेली स्मृतिचिन्हे आजही जुन्या स्मृतींना उजाळा देतात.

अगदी अलीकडे ज्ञान प्रबोधन शाळेच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला बाबासाहेब आले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. 5 व 6 जानेवारी 2007 रोजी छत्रपती शिवाजी महाराज ऑडिटोरियमचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्याप्रसंगी किरण ठाकूर, गजाननराव साठे, ॲड. दौलत मुतगेकर, आमदार मनोहर किणेकर, अजित गरगट्टी, नितीन कपिलेश्वरी, आर. डी. चौगुले, मालोजी अष्टेकर, मराठा लाईट इन्फंट्री सेंटरचे अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

*-मालोजी अष्टेकर – माजी महापौर बेळगाव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.