अथणी येथील हेस्कॉम कार्यालयातील मोठ्या भ्रष्टाचाराची चौकशी व तपास गेले दोन महिने सुरूच असून या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणण्यासाठी जवळपास 60 अधिकारी दिवसरात्र झटत आहेत. या अधिकाऱ्यांनी अद्याप आपला तपशीलवार अहवाल सादर केलेला नाही.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी अर्थात हेस्कॉमच्या अथणी कार्यालयामध्ये जवळपास 300 कोटी रुपयांहून अधिक निधीचा भ्रष्टाचार झाल्याचे तपास अधिकाऱ्यांना आढळून आले आहे.
सदर कार्यालयातील अधिकारी लाच स्वीकारून बेकायदेशीररित्या वीज पुरवठा करत होते. त्याचप्रमाणे जे लोक लाच देतील त्यांना हे अधिकारी सरकारी ट्रांसफार्मर्स, वायर्स आणि पिलर्स यांचाही पुरवठा करत होते.
अथणी हेस्कॉम कार्यालयात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. परिणामी या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणण्यासाठी कामाचा ताण वाढल्यामुळे तपासाचा तपशीलवार अहवाल सादर करण्यास विलंब झाला आहे.
हेस्कॉमच्या तांत्रिक आणि लेखा विभागाचे अधिकारी संयुक्तरित्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालिका डी. भारती यांनी दिली आहे. अथणी हेस्कॉम कार्यालयातील भ्रष्टाचाराबद्दल कांही आमदार आणि मंत्र्यांनी देखील तक्रारी केल्या आहेत.