मागचा संपूर्ण आठवडा दिवाळीच्या धूमधाम आणि उत्सवात गेला असला तरी आता दिवाळी संपली असून साऱ्यांनाच आपापल्या कामाला लागावे लागत आहे.
बँका व इतर खोळंबलेले व्यवहारही आज सोमवारपासून सुरू होणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात काम वाढणार आहे .
दिवाळीचा सण सर्वत्र आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज व इतर अनेक कारणांनी नागरिक उत्सवात व्यस्त असतात. त्यामुळे सुट्टी असते.
सुट्टीचा आनंद घेतानाच आर्थिक व्यवहारांवर ही गदा येते. बँकांना सुट्टी असल्यामुळे अनेक व्यवहार खोळंबले होते. आज सोमवारपासून सर्व व्यवहार सुरळीत होतील .अशी आशा निर्माण झाली आहे .
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या दिवाळी ने सारे वातावरण उत्साही आणि आनंदी बनवले. कोरोना आणि इतर कारणांमुळे अडकलेले व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले. बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. खरेदीचा उत्साह मोठा होता. त्यामुळे अनेक दिवस मंदीचा सामना करत असलेली बेळगावची बाजारपेठ या वेळी तेजीत दिसून आली.
कोट्यवधींचे व्यवहार बेळगाव बाजार पेठेने अनुभवले असून आता खऱ्या अर्थाने लोकांना कामाला लागण्याची वेळ आली आहे. शाळांनाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सुट्ट्या संपल्या असून सर्व शाळा व महाविद्यालये यांचे व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत.
सोमवारपासून आपल्या शाळांमध्ये दाखल होण्याची लगबग विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली असून कामाच्या निमित्ताने होणारी धावपळ पुन्हा एकदा सुरू झाली असल्याचे चित्र आहे.