मराठीचा बालेकिल्ला असलेल्या पंकजा कुगजी या येळ्ळूर च्या कन्येने भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत झेप घेतली आहे. यामुळे बेळगावकरांची आणि येळ्ळूर वासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे .
इतक्या मोठ्या पदावर पोचलेली बेळगावची पहिली महिला ठरण्याचा मानही तिने मिळवला आहे. वडील निवृत्त सुभेदार असल्यामुळे लहानपणापासूनच तिला देश सेवेबाबत आवड निर्माण झाली होती. वडील आनंद कुगजी यांच्या कडून बाळकडू घेतलेल्या पंकजा कुगजी यांना लष्करी सेवेचे आकर्षण होते.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतानाही त्यांनी याकडे आपले लक्ष वेधले होते. 2003-04 च्या दरम्यान पदवी शिक्षण घेत असताना लष्करी अधिकारी पदाच्या भरती बाबत त्यांनी अर्ज केला. अतिशय खडतर वाटणारी आव्हाने यशस्वीपणे पार करून त्या अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या.
आता सतरा वर्षे त्या सेवा देत असून लेफ्टनंट कर्नल म्हणून बढती मिळाली आहे. त्यांचे यश फार मोठे असल्याची प्रतिक्रिया तिच्या पालकांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
2004 मध्ये त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. ऑफिसर ट्रेनिंग अकादमी चेन्नईमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अरुणाचलप्रदेश येथे पहिल्यांदा त्यांची पोस्टींग झाली होती .आता सलग 17 वर्षे भारतीय लष्करात त्या काम करत आहेत.