शहरातील हॉटेल सन्मान समोरील सरकारी पशुचिकित्सालयामध्ये प्रभाग क्र. 7 चे नुतन नगरसेवक शंकर पाटील यांच्या प्रयत्नांमुळे नव्या एक्स-रे मशीनची व्यवस्था करण्यात आली असून या व्यवस्थेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील हॉटेल सन्मान समोरील सरकारी पशुचिकित्सालयामध्ये बऱ्याच काळापासून एक्स-रे मशीनची कमतरता होती. त्यामुळे दुखापतग्रस्त अथवा आजारी जनावरांवरील उपचारात अडथळा निर्माण होत होता.
पशु चिकित्सालयात एक्सरे मशीन नसल्यामुळे पशु पालकांची गैरसोय होऊन खाजगी दवाखान्यात त्यांना पैशाचा भुर्दंड सहन करावा लागत होता. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रभाग क्र. 7 चे नवनिर्वाचित नगरसेवक शंकर पाटील यांनी शरद पाटील व आपल्या अन्य सहकार्यांसह सदर पशुचिकित्सालयात एक्स-रे मशीन उपलब्ध करण्यासाठी पशु संगोपन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्याच्या उपसंचालकांकडे पाठपुरावा सुरू केला होता.
त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून हॉटेल सन्मान समोरील पशु चिकिस्तालयाच्या ठिकाणी आता नव्या एक्स-रे मशीनची सोय करण्यात आली आहे.
खाजगी पशु चिकित्सालयांमध्ये जनावरांच्या एक्स-रेसाठी जवळपास 900 रुपये खर्च येतो. या उलट सरकारी पशु चिकित्सालयांमध्ये हे काम किमान शुल्क आकारून’होते. तरी पशुपालकांनी याची नोंद घेऊन उपरोक्त एक्स-रे सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक शंकर पाटील यांनी केले आहे.