सरकारने अनुदान उपलब्ध करून दिल्यामुळे आता सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना लवकरच दोन जोड गणवेश उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दसरा सुट्टीनंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले नव्हते. तसेच विद्यार्थ्यांना फक्त पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावेळीही विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर गणवेश मिळणार की नाही अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
दसऱ्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांबरोबरच गणवेश देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.
दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात एक जोड व सहा महिन्यानंतर पुन्हा गणवेशासाठी कापड उपलब्ध करून दिले जाते. पहिली ते पाचवी व सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कापड उपलब्ध करून दिले जाते.
सरकारने गणवेश खरेदीसाठी अनुदान मंजूर केल्यामुळे आता कापड खरेदी करून विद्यार्थ्यांना ते लवकरच उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या जाणार आहेत. दरम्यान, दसऱ्यानंतर विद्यार्थ्यांना तयार माध्यान्ह आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता गणवेश वितरणासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे मत जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी व्यक्त केले आहे.