उलटी’ हा शब्द ऐकला की आपल्याला शिसारी येते. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत समुद्रातील व्हेल माशाची उलटी अत्यंत मौल्यवान समजली जाते. हीच 5 कोटी रुपये किमतीची अंबरग्रीस अर्थात व्हेल माशाची उलटी शिरसी ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री जप्त केली असून याप्रकरणी दोघा जणांना गजाआड केले आहे.
संतोष भालचंद्र कामत (वय 43, रा. बेळगाव) आणि राजेश मंजुनाथ नाईक (वय 32, रा. शिरसी अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयित त्यांची नांवे आहेत. यल्लापूर येथून व्हेल माशाची तस्करी केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच शिरसी ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त कारवाई केली. त्यांनी शिरसी शहरातील मराठीकोप्प येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील 5 किलो 50 ग्रॅम वजनाचा व्हेल मासा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सदर माशाची किंमत 5 कोटी रुपये आहे.
सदर माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी आरोपी मारुती स्विफ्ट कारगाडीतून मासा घेऊन जात होते. कारवार जिल्हा पोलीस प्रमुख शिवप्रसाद देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक रवी नायक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भीमाशंकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त अटकेची कारवाई केली. याप्रकरणी शिरसी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.