जनतेला भेडसावणारे नियम, प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी जनस्नेही पोलीस उपक्रमांतर्गत शहर आणि तालुक्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी काल गुरुवारी सायंकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत आपापल्या पोलिस स्थानक कार्यक्षेत्रात तायीगस्त घालून नागरिक आणि दुकानदारांच्या भेटी घेऊन विचारपूस करण्यासह त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
पोलिसांच्या कामात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असते हे लक्षात घेऊन जनस्नेही पोलीस उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पायीगस्त घालून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. काल सायंकाळी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी वैभवनगर परिसरात, मारुती पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी वंटमुरी जनता प्लॉटमध्ये, मार्केट पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी दरबार गल्ली परिसरात, त्याचप्रमाणे शहापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बसव सर्कल, नवी गल्ली, गणेशपूर गल्ली, गाडे मार्ग व सराफ गल्ली या भागात, खडेबाजार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली व शनी मंदिर परिसरात, कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सैनिक कॉलनीमध्ये आणि टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रानडे रोड, होसमनी चाळ, राघवेंद्र मठ, हॅक्सीन डेपो, विवेकानंद कॉलनी पहिला व दुसरा क्रॉस या भागात पायीगस्त घातली.
याव्यतिरिक्त उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरनगर, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बेळगुंदी गावात, काकती पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी वंटमुरी, बागेवाडी व मुत्नाळ गावामध्ये तर मारीहाळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सुळेभावी गावांमध्ये पायीगस्त घातली.
उपरोक्त सर्व पोलिस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत घातलेल्या तायीगस्त दरम्यान नागरिक आणि दुकानदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी दुकाने, उपहारगृहे, कॅन्टीन्स यांची पाहणी करून संबंधितांच्या कांही समस्या आहेत का ते जाणून घेतले. तसेच त्याला आवश्यक सूचना दिल्या.
ज्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत त्यांना ते बसवण्यास सांगण्यात आले. उपाहारगृहे व कॅन्टीनमध्ये मद्यपान वगैरे चालत नाही ना? याची चौकशी केली. सार्वजनिक ठिकाणी कोणतेही अवैध गैरप्रकार करू नका, आसपास गैरप्रकार प्रकार आढळून आल्यास त्वरित पोलिसांना त्याबाबत माहिती द्या आदी सूचना पोलीस अधिकारी सर्वांना देताना दिसत होते.