राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून राज्यातील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्गदेखील सुरु करण्यात आल्यामुळे बेळगाव शहरातील विविध शाळांमधील हे वर्ग पुन्हा मुलांनी गजबजून गेले.
कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्यानंतर राज्य सरकारने टप्प्या-टप्प्याने शाळा महाविद्यालय सुरू केली. प्रारंभी पदवीपूर्व, उच्च माध्यमिक त्यानंतर माध्यमिक वर्ग सुरू करण्यात आले. प्राथमिक वर्ग सुरू करण्यास काहीसा विलंब झाला तरी कोरोना सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार आज 25 ऑक्टोबरपासून कोरोनाचे नियम पाळून हे वर्ग देखील सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आज सकाळी शहरातील विविध प्राथमिक शाळांची आवार विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व पालकांनी गजबजून गेले होती.
शहरातील प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये आज सकाळी प्रत्येक विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करून शाळेत प्रवेश दिला जात होता. विद्यार्थ्यांमध्ये खोकला सर्दी तापाची लक्षणे आढळल्यास त्यांना माघारी धाडले जात होते. सामाजिक अंतराचा नियम पाळून मुलामुलींना शाळेत प्रवेश दिला जात असल्यामुळे सकाळी शाळांच्या प्रवेशद्वारासमोर पालकांसमवेत आलेल्या मुला-मुलींच्या रांगा पहावयास मिळत होत्या.
कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असल्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
शाळेत सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुरवातीचे पहिले पाच दिवस सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत वर्ग भरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सुरूवातीला विद्यार्थ्यांना तयार माध्यान्ह आहाराचे वाटप केले जाणार नाही. मात्र 2 नोव्हेंबर नंतर पूर्णवेळ शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार दिला जाणार आहे.