दसरा -विजयादशमीचा सण तोंडावर आल्यामुळे आज बेळगावच्या होलसेल फुलमार्केटमध्ये विविध प्रकारच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होण्याबरोबरच फुलं खरेदीसाठी बेळगावसह गोवा व महाराष्ट्रातील ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. फुलांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या खरेदी-विक्रीमुळे आज सकाळी या मार्केटमध्ये जवळपास तब्बल 1 कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुभाषनगर येथील होलसेल फुल मार्केटमध्ये आज ग्राहकांची दसऱ्याच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. सण तोंडावर आल्यामुळे या मार्केटमध्ये काल रात्री पासून विविध प्रकारच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती.
दसरा -विजयादशमी सणासाठी आज फुलांनाही प्रचंड मागणी असल्यामुळे त्यांचा दर देखील चांगलाच वाढला होता. फुल मार्केटमध्ये आज प्रति किलो फुलांचा दर पुढील प्रमाणे होता. झेंडू 20 ते 100 रु., गुलाब 200 ते 350 रु., गलाठा 100 ते 200 रु., यलो झेंडू 40 ते 120 रु., अस्टर 150 ते 250 रु., बेंगलोर व्हाईट 150 ते 300 रु., बेबीडाॅल व्हाईट 120 ते 180 रु., जेरबेरिया 10 फुलांना 80 ते 100 रु., यलो राणीफुल 250 ते 300 रु., गुलाब गुच्छ 50 ते 100 रुपये.
बेळगावच्या होलसेल फुल मार्केटमध्ये आज सकाळी दसऱ्याच्या खरेदीसाठी बेळगावसह निपाणी, अथणी, चिक्कोडी, बैलहोंगल, सौंदत्ती, कारवार आदी ठिकाणच्या तसेच महाराष्ट्र आणि गोवा, तसेच कोकणातील सावंतवाडी, वेंगुर्ला येथील ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे सकाळच्या प्रहरी फुलांच्या खरेदी -विक्रीला ऊत आला होता. मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाल्यामुळे आज सुभाषनगर येथील होलसेल फुल मार्केटमध्ये जवळपास 1 कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती फुल विक्रेत्यांनी दिली.
सुभाषनगर होलसेल फुल मार्केटमध्ये मुख्यत्वेकरून राणी फुलासह गुलाबाची फुले बेंगलोरहून येतात. गलाटा फुलांची आवक प्रामुख्याने हालगा भागातून होते.
त्याचप्रमाणे हालगासह बाळेकुंद्री, बेळगुंदी, किणये व येरगट्टी येथून झेंडूची फुले मार्केटमध्ये येतात येरगट्टी येथून प्रामुख्याने बेबीडॉल पेपर व्हाईट, पोर्णिमा या फुलांची आवक होते. या सर्व फुलांना आज मार्केटमध्ये प्रचंड मागणी होती. त्यामुळे व्यापारीवर्गात उत्साह आणि खुशीचे वातावरण पहावयास मिळाले.