बेळगाव शहरातील कॉलेज रोडचे नामकरण करण्यात आले असून यापुढे हा मार्ग ‘त्यागवीर शिरसंगी लिंगराजू रोड’ या नांवाने ओळखला जाणार आहे
शहरातील कॉलेज रोडचे नांव बदलून या रस्त्याला त्यागवीर शिरसंगी लिंगराजू रोड असे नामकरण करण्याचा कार्यक्रम आज सकाळी पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगला अंगडी, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार ॲड. अनिल बेनके, माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर व इतर अधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून रस्त्याच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
गदग येथे रामाप्पा मदली (उर्फ शिरसंगी लींगराज /लिंगराजू देसाई) यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांना गदग येथील शिरसंगी नवलगुंद -देसाई आणि गंगाबाई यांनी दत्तक घेतले. पुढे ते शिरसंगी नवलगुंद आणि सौंदत्ती संस्थानाचे प्रमुख झाले.
कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीच्या केएलई कॉलेजला त्याकाळात त्यांनी 5 हजार रुपयांची देणगी दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून या कॉलेजला शिरसंगी लिंगराज यांचे नांव देण्यात आले होते. अनावरण झालेल्या फलकात मराठीला स्थान न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
त्यांनी आपली संपत्ती शिक्षणासाठी दान केली. या त्यांच्या महान कार्याबद्दल कॉलेज रोडला शिरसंगी लींगराजू यांचे नाव देण्यात आले आहे.