कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून येत्या आठ दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्थानकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हे आधुनिक स्मार्ट बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्यामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाणार आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील बस स्थानकातून गोवा खानापूर कारवार तसेच किनी व बेळगाव ग्रामीण भागातील बसची ये-जा असते त्यामुळे मध्यवर्ती बस स्थानकाप्रमाणे या स्थानकावर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू होते. हे काम सुमारे 11 महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून हे बस स्थानक विकासाच्या प्रतीक्षेत होते. या स्थानकाचा विकास व्हावा अशी सातत्याने मागणी होत होती.
आता विविध विकास कामे राबवून या बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला असून हे स्मार्ट बसस्थानक झाले आहे. या ठिकाणी 12 दुकान गाळे, केएसआरटीसीचे एक कार्यालय, दोन तिकीट काउंटर, एक पोलीस चौकी आणि एक वूमन सेल बनविण्यात आला आहे. बसस्थानक आवारात गटारीची सोय करण्याबरोबर पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. याखेरीज 12 बसेससाठी प्लॅटफॉर्म, फुटपाथ आणि अद्ययावत छतही बनविण्यात आले आहे. यासर्व नूतनीकरण कामांसाठी 1.8 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
विकास कामे राबवून बस स्थानकाचा कायापालट करण्यासाठी 9 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. हा कालावधी गेल्या ऑगस्टमध्ये पूर्ण झाला होता. मात्र एप्रिल दरम्यान कोरोना प्रादुर्भावामुळे कामगारांची कमतरता जाणवली होती. परिणामी कामाचा कालावधी वाढवून देण्यात आला आणि सप्टेंबरअखेर सर्व कामे पूर्ण करण्यात आली.
यामुळे प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते सदर बसस्थानक नूतनीकरणाचा शुभारंभ झाला होता. आमदार ॲड. बेनके यांनी रेल्वे स्थानकासमोरील बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच येत्या आठ दिवसात स्थानकाचे उद्घाटन करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.