बेळगावच्या पृथ्वीराज कोंगारी या 11 वर्षाच्या डान्सरने सोनी टीव्हीच्या सुपर डान्सर नृत्य स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवताना मंचावर खऱ्या अर्थाने राज्य केले.
प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून पृथ्वीच्या नृत्य प्रवासाची परीक्षक शिल्पा शेट्टी, गीता कपूर व अनुराग कश्यप यांनी सुद्धा वारंवार वाहव्वा केली आहे.
पृथ्वीराज वडगावच्या मलप्रभानगर येथे राहत असून त्याचे वडील अशोक कोंगारी हे अशोक शुरपाली यांच्याकडे पॉवरलूमवर काम करतात, तर आई राजेश्वरी या गृहिणी आहेत. मुलाच्या नृत्याच्या आवडीला त्यांनी प्रोत्साहन दिले आणि पृथ्वीचा सुपर डान्सरच्या स्पर्धेमध्ये समावेश होऊ शकला.
इतर मुलांप्रमाणे पृथ्वीला सर्व त्या सुविधा आपण देऊ शकलो नाही. परंतु त्याच्या नृत्य कलेला आपण प्रोत्साहन मात्र नक्की दिले, असे त्याचे वडील अशोक यांनी या मंचावरून सांगितले होते.
पृथ्वीच्या कौतुकासाठी अशोक शुरपाली यांनी ‘पृथ्वीराज साडी’ हा साडीचा नवा ब्रँड देखील तयार केला. विशेष म्हणजे स्पर्धेच्या अंतिम फेरी दिवशी पृथ्वीराजची आई राजेश्वरी यांनी तीच साडी परिधान केली होती.