कित्तूर तालुक्यामध्ये कांही जैन बांधवांना धर्मांतरासाठी भाग पाडण्यात येत आहे. जैन धर्म सोडून त्यांना ख्रिश्चन धर्मात परिवर्तीत करण्यासाठी दबाव आणला जात असून या प्रकाराला तात्काळ आळा घालण्यात यावा, अशी मागणी विविध जैन संघटनांतर्फे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथून मोर्चाने जाऊन जैन संघटनांतर्फे आज सकाळी जिल्हाधिकार्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन देण्यात आले.
कित्तूर तालुक्यातील एका गावामध्ये गरीब जैन कुटुंबातील व्यक्तींना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेल्या महिन्यात याबाबतची माहिती मिळताच जैन युवा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंब कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर देण्याबरोबरच धर्मांतराच्या आमिषाला बळी पडू नये, असा सल्ला दिला होता.
मात्र आता पुन्हा गावातील अन्य जैन कुटुंबियांना आमिष दाखविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन सदर प्रकारांना त्वरित आळा घालावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी शहर व जिल्ह्यातील विविध जैन संघ -संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.