गुरुकुल पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच जगात माणुसकी अद्याप जिवंत आहे हे लोकांना सांगण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक बंदीचे महत्त्व विशद करण्यासाठी 420 दिवसात 15 राज्यांचा पायी प्रवास करणाऱ्या एका दुर्दम्य इच्छाशक्तीच्या किशोरवयीन मुलाचे बेळगावात आगमन झाले आहे. रोहन अगरवाल असे या मुलाचे नांव असून पृथ्वीवरील सर्वात शीत प्रदेशात असलेल्या सैबेरियापर्यंत चालत प्रवास करणे हे नागपुर महाराष्ट्र येथील 19 वर्षीय रोहन याचे ध्येय आहे.
देशभर पायी प्रवास करून मानवतेचा संदेश देण्यासाठी रोहन अगरवाल घराबाहेर पडला आहे. वाचनाद्वारे मिळालेल्या पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीच्या माहितीने प्रभावित झालेल्या रोहन याने बीकॉम द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम अर्ध्यावर सोडून पायी देशाटन करण्याचा निर्णय घेतला. ‘देश पर्यटनच माझे विश्व विद्यालय’ असे मानून घराबाहेर पडताना रोहनचे वय अवघे 18 वर्षे होते. वाराणसी येथे गंगा नदीत स्नान करून त्याने आपल्या पायी प्रवासाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर पायी आणि दुचाकीस्वारांची लिफ्ट अशा पद्धतीने त्याने 420 दिवसात देशातील 15 राज्यांचा प्रवास केला आहे. हा टप्पा पूर्ण झाला त्यावेळी रोहनचे वय 19 वर्षे झाले होते.
वाराणसी येथून प्रवासाला प्रारंभ करताना त्याच्याकडे स्टाॅक मार्केटमधील व्यापारातून मिळालेले फक्त 2500 रुपये होते. याव्यतिरिक्त छोट्या बॅगेत कांही कपडे मोबाईल फोन आणि पॉवर बँक इतके साहित्य होते. त्यानंतर गेला 420 दिवसात त्याने 15 राज्यातील संमिश्र भौगोलिक रचनेतून पायी प्रवास केला आहे. याबद्दल माहिती देताना रोहन अगरवाल म्हणाला की, आतापर्यंत मी उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, पांडेचरी अशा 15 राज्यांचा प्रवास केला आहे. यासाठी मला 420 दिवस लागले आहेत.
मी फक्त चालत आणि लिफ्ट घेऊन प्रवास करतो. वाटेत कोणी लिफ्ट दिली तरच ती घेतो. लोकांच्या प्रेम आणि स्नेहा मुळे माझा प्रवास अखंड सुरू आहे. बरेच जण आता माणुसकी राहिले नाही असे म्हणत असतात तथापि माणुसकी अजून जिवंत आहे हे मला दाखवून द्यायचे आहे. त्याचप्रमाणे भाषा, जाती -धर्म लिंग आदींमधील भेदभाव दूर झाला पाहिजे यासाठी माझी ही पायी मोहीम आहे. याखेरीज मी प्लास्टिकबाबत जनजागृती करत आहे.
प्लास्टिक बाबत लोकांना जागृत करून त्याचे दुष्परिणाम आणि पर्यायांची माहिती देणे हे माझे प्रवासादरम्यानचे काम आहे. या पायी प्रवासाद्वारे मला खूप कांही शिकायला मिळत आहे असे सांगून माझा हा पायी प्रवास पृथ्वीवरील सर्वात थंड प्रदेश असलेल्या सैबेरियापर्यंत (जेथे तापमान -72 डिग्री सेल्सिअस इतके असते) अखंड सुरू राहणार आहे. माझा हा प्रवास यशस्वी झाला तर सैबेरियाला पायी जाणारा मी पहिला भारतीय ठरणार आहे, अशी माहिती रोहन अगरवाल याने दिली.
बेळगाव शहरात देखील रविवारी त्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.