भाताचं पिकलं पान… कसं सोनसळ झाले रान, मोत्या माणकाचे दे दान… राहत्या घामाचं झालं दान, या गीताप्रमाणे सध्या ग्रामीण भागातील अख्खी शिवार भाग पिकाने बहरून गेली आहेत.
सगळ्या शिवारांमध्ये भाताचा सुगंधी घमघमाट पसरला आहे. पावसाळ्यानंतर धरतीन आपलं दान दोन्ही हाताने माणसावर उधळल आहे. बेळगाव तालुक्यात सुगीचे दिवस सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या भात कापणीला वेग आला आहे.
दसऱ्यानंतर आता भाताची सुगी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग सुगीच्या कामांमध्ये व्यस्त झालेला पहावयास मिळत आहे.
ग्रामीण भागात ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे एकमेकाचे भात कापण्यासाठी मदतीचा हात पुढे करून सुगीला जोर आला आहे.
अलीकडे आधुनिक शेती पद्धतीमध्ये मशीनद्वारे भात कापणी साठी प्रोत्साहन दिले जात असले तरी तालुक्याच्या बहुतांश भागात हातानेच भात कापणी सुरू आहे.