शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भांदूर गल्लीमध्ये 1 कोटी 60 लाख रुपये खर्चून विविध विकास कामे राबविण्यातद्वारे या गल्लीचा कायापालट केला जाणार असून येथील डेकोरेटिव्ह लाईटचा शुभारंभ कार्यक्रम काल मोठ्या उत्साहात पार पडला.
भांदूर गल्ली येथे काल बुधवारी रात्री आयोजीत सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह स्थानिक नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांच्या हस्ते डेकोरेटिव्ह लाईटच्या खांबाचे पुष्पहार घालून श्रीफळ वाढवण्याद्वारे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार ॲड. बेनके यांनी बटन दाबून डेकोरेटिव्ह लाईट प्रज्वलित केले.
याप्रसंगी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, डेकोरेटिव्ह लाईट वगैरे बसवून आमच्या गल्लीचा सर्वांगीण विकास केला जावा अशी भांदूर गल्ली येथील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती.
या मागणीची पूर्तता मी करत असून 1 कोटी 60 लाख रुपये खर्च करून भांदूर गल्ली येथे डेकोरेटिव्ह लाईटसह चांगल्या गटारी, ड्रेनेज, रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे, जलशुद्धीकरण यंत्रणा आदी सर्व मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. टेंडर मंजूर करून ही विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी निर्मिती केंद्रावर सोपविण्यात आली आहे.
येत्या काही दिवसात रीतसर भूमिपूजन करून या विकास कामांचा शुभारंभ केला जाईल. उपरोक्त विकास कामे राबविण्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्त्वावर भांदूर गल्लीची निवड केली आहे. येत्या 6 महिन्यात या ठिकाणची सर्व विकासकामे पूर्ण केली जातील असे सांगून याच पद्धतीने शहरातील अन्य गल्ल्यांचा देखील विकास साधला जाईल, असे आमदार ॲड. बेनके यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नगरसेविका वैशाली भातकांडे,पूजा पाटील,बाळकृष्ण तोपीनकट्टी ,विजय होंनगेकर,मनोहर सांबरेकर, सिद्धार्थ भातकांडे, युवराज मलकाचे भांदूर गल्ली परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.