सीमाभागाला असलेला महाराष्ट्राचा परीसस्पर्श कोणत्या ना कोणत्या पद्धतीने पुसून टाकण्याचा प्रयत्न कर्नाटकातील शासनकर्ते वारंवार करीत असतात.
बेळगावचे बेळगावी असे नामकरण करून झाले,बेळगाव आणि सीमाभागात कन्नडची सक्ती करून झाली आता मुंबई कर्नाटका रिजन ही जुनी ओळखही पुसण्याचा घाट घातला जात आहे.
बेळगावात कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याचा उच्चार केला आहे. उत्तर कर्नाटकातील काही भाग अर्थात महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडलेला सीमाभाग संपूर्ण देशात मुंबई कर्नाटका रिजन म्हणून ओळखला जातो. आज नव्हे तर ब्रिटिश काळात मुंबई प्रांत असताना पासूनची ही ओळख आहे. मात्र ही ओळख पुसण्याच्या प्रयत्नात आता कर्नाटकाचे राजकारणी गुंतलेले आहेत.
मुंबईपासून सुरू होऊन कारवारपर्यंत येणाऱ्या भागाला मुंबई कर्नाटक रिजन म्हटले जाते. जसे हैद्राबाद कर्नाटक तसेच मुंबई कर्नाटक असे बोलण्याची ती पूर्वापार पद्धत आहे. मात्र कॅबिनेट बैठक घेऊन आता या भागाला कित्तुर कर्नाटक असे सबोधण्याची तयारी कर्नाटक सरकार करणार आहे.
तसे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री बोम्माई यांनी दिले आहेत. येत्या 23 तारखेपूर्वी निर्णय घेऊन कित्तुर उत्सवात याची घोषणा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.