भारतात अलीकडे कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत असले तरी आता नवीन माहिती उघड झाल्याने चिंता वाढली आहे ब्रिटन आणि युरोपातील अनेक देशात हाहाकार माजविणारा कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा प्लस एवाय 4.2 आता भारतात सापडला आहे.
आपल्या देशात आंध्र प्रदेशात 7, कर्नाटकात 2, तेलंगणा 2, केरळ 2, जम्मू व काश्मीर आणि महाराष्ट्र येथे प्रत्येकी 1 सॅम्पल आढळले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा प्लस एवाय 4.2 संबंधी आपला देश सतर्क आहे. संसर्गाच्या या व्हेरिएंटवर एक विशेष पथक तपास करीत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी दिली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (एनडीसी) पथकांवर विविध प्रकारचा अभ्यास तसेच विश्लेषणाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मांडविया यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रक्रियेनुसार तांत्रिक समितीने को-हॅक्सीनला मंजुरी दिली आहे, तर यासंदर्भात इतर एका समितीची बैठक होणार आहे. याच बैठकीच्या आधारे को-हॅक्सीनला मंजुरी मिळेल असेही मांडविया यांनी स्पष्ट केले.
येत्या काळात देशाला कोणत्याही महामारीचा सामना करण्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य ‘प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर’ करेल. या योजनेवर पाच वर्षात 64 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. ब्लॉक, जिल्हा, प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पातळीवर चांगल्या प्रयोगशाळा उभारण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे.
सदर योजनेनुसार एका जिल्ह्यात सरासरी 90 ते 100 कोटी रुपये खर्च केले जातील, असे मांडविया यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 157 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या जागा जवळपास दुप्पट झाल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.