बेळगाव शहरातील मराठा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जत्तीमठामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीची श्री दुर्गामाता मूर्ती साकारून लक्षवेधी आरास व देखावा सादर केला जातो. यंदादेखील या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असा झोपाळ्यावर विराजमान झालेल्या श्री दुर्गामाता देवीचा हलता देखावा सादर करण्यात आला आहे. केवळ कागद आणि रंगाचा वापर करून कोणताही पीओपीचा वापर न करता दुर्गामाता साकारण्यात आली आहे.
शहरातील जत्तीमठामध्ये यंदा नवरात्र उत्सवानिमित्त साकारण्यात आलेला जवळपास 15 फुटी झोपाळ्यावर विराजमान झालेल्या श्री दुर्गामाता देवीचा हलता देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. सदर झोपाळ्यावर बसलेल्या श्री दुर्गामाता देवीच्या मूर्तीचे मूर्तिकार तानाजी गल्ली येथील वसंत पाटील हे असून त्यांना विश्वनाथ शिंदे, परशराम पाटील व सुनील आनंदाचे या तिघांचे सहकार्य लाभले आहे.
सदर पर्यावरण पूरक मूर्ती तयार करण्यासाठी कागदाच्या लगद्याचा वापर करण्यात आला आहे हे विशेष होय. श्री दुर्गामाता देवीची ही प्रमाणबध्द आकारातील रेखीव सुंदर आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी जत्तीमठ येथे भाविकांची वाढती गर्दी होत आहे.
यासंदर्भात मूर्तिकार वसंत पाटील यांनी बेळगाव लाईव्हला माहिती देताना सांगितले की झोपाळ्यावरील देवीच्या मूर्तीची संकल्पनाही शिवसेना आरोग्य कक्षाचे प्रमुख दत्ता जाधव यांची असल्याचे सांगितले. दत्ता जाधव यांच्या सूचनेनुसार माझी कल्पकता वापरून मी माझ्या पद्धतीने डिझाईन तयार केले. झोपाळ्यावर मूर्तीला विराजमान करायचे म्हणजे मूर्ती हलकी हवी हे लक्षात घेऊन मी मूर्तीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिस अथवा शाडूच्या मातीऐवजी कागदाच्या लगद्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मूर्ती बनवली.
त्यानंतर मूर्तीला रंगरंगोटी करून खरी साडी नेसवली. ही मूर्ती साधारण 7 फूट उंचीची असून ती 15 फूट उंचीच्या झोपाळ्यावर बसविण्यात आली आहे अशी माहिती देऊन या पद्धतीचा झोपाळ्यावरील देवीच्या मूर्तीचा हलता देखावा शहरात प्रथमच तयार करण्यात आला असल्याचे मूर्तिकार वसंत पाटील यांनी स्पष्ट केले.