भारतीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जावा, अशी मागणी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केंद्रीय पर्यटन, बंदर, जहाज आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय पर्यटन, बंदर, जहाज आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे आज रविवारी बेळगाव भेटीवर आले असता आमदार ॲड. अनिल बेनके यांनी त्यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी कणबर्गी येथील चोळ राजवंश कालीन श्री सिद्धेश्वर मंदिर हे उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यातील बहुसंख्य पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
त्यामुळे भारतीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून या मंदिर परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जावा, अशी विनंती आमदार बेनके यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली.
त्यांच्या विनंतीला मान देताना मंत्री नाईक यांनी त्यासंदर्भात लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.