तलावामध्ये विषारी रसायन टाकण्यात आल्यामुळे शेकडो मासे मृत होऊन सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची खळबळजनक घटना कडसगट्टी गावांमध्ये उघडकीस आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात असणाऱ्या कडसगट्टी गावानजीकच्या लघुपाटबंधारे तलावामध्ये अज्ञातांनी विषारी रसायन टाकल्यामुळे तलावातील मासे मोठ्या प्रमाणात मृत झाले असून त्यांची किंमत अंदाजे 5 लाख रुपये इतकी होते. सदर तलावातील पाण्याचा वापर आसपासच्या पाच गावातील ग्रामस्थांकडून केला जातो.
तसेच या तलावांमध्ये मत्स्यपालन देखील केले जाते. यासाठी दरवर्षी निविदा काढली जाते. त्यातून मिळणाऱ्या नफ्याचा वापर गावातील देवस्थानाच्या आणि गावाच्या विकासासाठी केला जातो. हे सत्कार्य पाहावत नसलेल्यांकडून तलावात विषारी रसायन टाकण्याचा निंद्य प्रकार करण्यात आला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विषारी रसायन मिसळल्यामुळे तलावाचे पाणी आता वापरासाठी देखील निरुपयोगी ठरले आहे. तेंव्हा सदर मत्स्यहानीच्या प्रकाराचा तपास करून दोषी व्यक्तींना कडक शासन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
घटनास्थळी भेट देणाऱ्या तहसीलदारांना ग्रामस्थांनी अशा आशयाचे निवेदन सादर केले आहे. तलावात विषारी रसायन मिसळण्याचा हा प्रकार सध्या चर्चेचा विषय झाला आहे.