1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव दिन भव्य प्रमाणात साजरा करू नये, अशी सूचना पोलिसांनी दिल्याच्या निषेधार्थ कर्नाटक नवनिर्माण सेनेने गुरुवारी रात्रभर आंदोलन छेडले.
कर्नाटक राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करू नये अशी सूचना प्रत्येक कन्नड संघटनांना पोलीस स्थानकात बोलावून देण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ सुमारे दोन डझन कन्नड कार्यकर्त्यांनी काल रात्री राणी चन्नम्मा सर्कल येथे धरणे आंदोलन छेडून निदर्शने केली.
कर्नाटक नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संपतकुमार देसाई यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करू नये याचे कोरोना प्रादुर्भाव हे जर कारण असेल तर राजकीय सभा -समारंभांना कशी परवानगी मिळते?
निवडणुकाही कशा घेण्यात आल्या? जर या सर्वांना परवानगी मिळू शकते, तर कर्नाटक राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात काय गैर आहे? अशी पृच्छा करून परवानगी मिळो वा न मिळो आम्ही भव्य प्रमाणात राज्योत्सव साजरा करणारच असा निर्धार देसाई यांनी व्यक्त केला.