महाराष्ट्र एकीकरण समिती एक नोव्हेंबरला कर्नाटकात काळा दिन पाळणारी संघटना आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी घाला. या संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर राजद्रोहाचा खटला दाखल करा. अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या एका गटाने बेळगावच्या जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाने ही मागणी केली असून नेहमीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात गरळ ओकली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती कर्नाटक द्रोही संघटना आहे.
त्यामुळे राजद्रोहाचा खटला दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी आणि या संघटनेवर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती चा लढा केंद्राच्या विरोधात सुरू आहे. कर्नाटकाने मूलभूत हक्क द्यावेत यासाठी वारंवार आंदोलन केले जाते. एक नोव्हेंबरला महाराष्ट्राला जोडलेला सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला त्यामुळे त्या दिवशी काळा दिन पाळण्यात येतो.
असे असताना या प्रकारची मागणी झाल्यामुळे कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा एकंदर अभ्यास दिसून आला असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाबतीत या ना त्या कारणाने गरळ ओकण्याचा प्रकार सुरू झाल्याचे दिसून येत आहे.