कित्तूर विजय उत्सवानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात संचार करून आलेल्या वीर ज्योतीचे उस्फुर्त स्वागत करण्याबरोबरच ध्वजारोहणाने यंदाच्या कित्तूर उत्सव -2021 ला मोठ्या दिमाखासह जल्लोषात प्रारंभ करण्यात आला.
कित्तुर उत्सवानिमित्त दरवर्षीच्या परंपरेनुसार राणी चन्नम्मा समाधी स्थळ असलेल्या बैलहोंगल येथून निघून संपूर्ण जिल्ह्यात संचार करून आलेल्या वीर ज्योतीचे कित्तूर येथील राणी चन्नम्मा चौकात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उत्सवाचे ध्वजारोहन करण्याबरोबरच वीरज्योत स्वीकारण्याद्वारे कित्तूर उत्सवाला चालना दिली. चन्नम्मा कित्तुर राजगुरू संस्थान मठाचे मडिवाळ राजयोगेंद्र स्वामीजी यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास आमदार महांतेश दोड्डगौडर, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., बैलहोंगल उपविभागाधिकारी शशिधर बगली, माहिती व प्रसिद्धी खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, कन्नड व संस्कृती खात्याच्या सहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री, कित्तुरचे तहसीलदार आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार मंगला अंगडी यांनी कित्तूर उत्सवाचा शुभारंभ केल्यानंतर शुभारंभ निमित्त आयोजित वीर ज्योतीच्या भव्य मिरवणुकीचे उद्घाटन चन्नम्मा कित्तुर राजगुरू संस्थान मठाचे मडिवाळ राजयोगेंद्र स्वामीजी यांच्या हस्ते फित कापून झाले. सदर मिरवणुकीत विविध पारंपारिक नृत्य प्रकार आणि वाद्य वृद्धांचा सहभाग होता.
जिल्ह्यातील शेकडो कलाकारांचा सहभाग असणारी ही मिरवणूक सार्यांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी जानपद गीतांचे सादरीकरण करण्याद्वारे कित्तुर संस्थानाचे गतवैभव तसेच शौर्य आणि साहसाचे वर्णन केले जात होते. विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या लोक कलाकारांचा सहभाग असणाऱ्या या मिरवणुकीने सार्यांची मने जिंकली. कित्तुर गावातील प्रमुख मार्गावरून ही जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
कित्तुर उत्सवाच्या शुभारंभानिमित्त कित्तूर प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असलेल्या वीर संगोळी रायण्णा आणि अमटूर बाळप्पा यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उत्सवाचा एक भाग असणाऱ्या विशेष ध्वजारोहणासह वस्तु प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आले.