कर्नाटकच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करायचे असे गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी जणू आपल्या मनाशी निश्चित केले आहे. लॉबिंग करण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून असलेल्या जारकीहोळी यांनी आता मंत्रिपदासाठी देवाचा धावा करताना चक्क केदारनाथला साकडे घातले आहे.
कथित अश्लिल सीडी प्रकरणामुळे मंत्रीपद गमावल्यापासून अस्वस्थ झालेले आमदार रमेश जारकीहोळी हे येनकेन प्रकारे मंत्रीपद मिळवायचेच या जिद्दीने पेटले आहेत.
त्यासाठीच लॉबिंग करण्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली आहे कांही कमी राहू नये म्हणून आता उत्तराखंडातील केदारनाथ या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री जाऊन त्यांनी देवाला साकडे घातले आहे. याप्रसंगी त्यांच्यासमवेत यांचे मेहुणे अंबिराव पाटील पुत्र अमरनाथ आणि कुटुंबीय उपस्थित होते.
यापूर्वी मंत्री होण्याच्या एक महिना आधी रमेश जारकीहोळी यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले होते. त्यावेळी केदारनाथ पावल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाले होते.
त्यासाठीच म्हणून की काय आताही मंत्रीपद मिळवण्यासाठी पुन्हा त्यांनी केदारनाथला साकडे घातले आहे. मात्र यावेळी देखील केदारनाथ त्यांना पावणार का ते पाहावे लागेल.