बांगलादेशात काही दिवसांपूर्वी हिंदूंच्या अनैक मंदिरासह इस्कॉन मंदिरावर हल्ला करण्यात आला आणि काही लोकांची हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध जगभर करण्यात येत असून आज शनिवारी जगातील 150 देशांमध्ये या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन ) बेळगाव शाखेतर्फेही बेळगावचे अध्यक्ष श्री भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पाच वाजता इस्कॉनच्या शुक्रवार पेठ येथील मंदिरापासून एक निषेध मोर्चा निघाला.
या मोर्चात शेकडो भक्त सहभागी झाले होते. इस्कॉन मंदिर पासून गोवावेस पर्यंत हातात निषेधाची फ्लॅग घेतलेले शेकडो आबालवृद्ध सहभागी झाले होते. ‘हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे’ या महामंत्राचा जप व भजन करीत सहभागी झालेल्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले या मोर्चाला सरकारी परवानगी न मिळाल्यामुळे मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला असून परत इस्कॉन मंदिर पर्यंत येऊन मोर्चा विसर्जित झाला.
बांगलादेशातील हिंदू मंदिरांचे रक्षण करा, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करा, हिंदुना सुद्धा मानव अधिकार आहेत, इस्कॉन शांततेचे पुरस्कर्ते आहेत. असे फलक हातात घेतलेल्या स्त्री पुरुष या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
ही घटना अतिशय गांभीर्याने घेऊन सरकारने हल्लेखोरांवर कारवाई करावी व अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निवेदन आज जगभरातून सरकारला देण्यात आले .
इस्कॉन च्या वतीने युनायटेड नेशन्स ला एक प्रस्ताव पाठवण्यात आला असून संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे .टिळकवाडी पोलीस ठाण्याचे श्री राघवेंद्र हवालदार यांनी सहभाग घेऊन मोर्चा शांततेने पार पाडण्यासाठी सहकार्य केले