मुसळधार पावसामुळे सन्नहोसुर (ता. खानापूर) येथील घर कोसळलेल्या एका गरीब शेतकऱ्याला अद्यापही कोणतीच मदत न मिळाल्यामुळे त्याच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली असून संबंधित शेतकऱ्याला आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
तोपीनकट्टी (ता. खानापूर) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या सन्नहोसुर गावातील लक्ष्मी गल्ली येथे राहणाऱ्या ज्योतिबा विष्णू गुरव या गरीब शेतकऱ्याचे घर गेल्या दोन महिन्यापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळले आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत विकास अधिकार्यांकडे (पीडिओ) तक्रार करून देखील त्यांनी अद्याप गुरव यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे गरीब परिस्थिती असणाऱ्या ज्योतिबा गुरव यांना अद्याप आपल्या घराची व्यवस्थित डागडुजी करता आलेले नाही. परिणामी आपल्या लहान अपंग मुलांसमवेत यांना स्वतःचे घर असून देखील उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
सरकारकडून गुरव यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी गावातील नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि त्यांच्या मागणीकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
तरी खानापूरचे आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी कृपया या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन जोतिबा गुरव यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.