माणुसकी हरवलेल्या कुटुंबीयांच्या दुर्लक्षामुळे स्वतःच्याच घरात आजारी व जखमी अवस्थेत असहाय्यपणे बंदिस्त पडून असलेल्या हे एका वयोवृद्ध इसमाला हेल्प फाॅर निडीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज दुपारी सपार गल्ली वडगाव येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की, सपार गल्ली वडगाव येथे एक वयोवृद्ध इसम गेल्या कांही दिवसापासून जखमी अवस्थेत असहाय्यपणे आपल्या घरात कोंडलेल्या अवस्थेत पडून असल्याची माहिती हेल्प फाॅर निडी संघटनेचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना आज सकाळी मिळाली. तेंव्हा त्यांनी रुग्णवाहिका घेऊन तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह सपार गल्ली येथे धाव घेतली. तेव्हा संबंधित वृद्ध इसम स्वतःच्या घरामध्ये एका खोलीत कोंडलेल्या अवस्थेत जमिनीवर पडून असल्याचे दिसले.
शिवाय खोलीतील टीव्ही वगैरे सर्व साहित्य विखरून पडल्याचे आढळून आले. त्यावेळी त्या इसमाची विवाहित मुलगी देखील त्या ठिकाणी उपस्थित होती. चौकशीअंती माणुसकी हरवलेल्या कुटुंबीयानी दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित वृद्धाची असहाय्य अवस्था झाल्याचे अनगोळकर यांच्या निदर्शनास आले. त्याचप्रमाणे त्या बिचाऱ्या वृद्धाबद्दल त्याच्या मुलीला अजिबात दयामाया वाटत नसल्याचेही दिसून येत होते.
प्रारंभी त्या वृद्धाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास त्याच्या मुलीने आक्षेप घेतला. तेंव्हा सुरेंद्र अनगोळकर यांनी ही बाब शहापूर पोलिसांच्या कानावर घालून त्यांच्या मध्यस्थीने संबंधित वृद्ध इसमाच्या कुटुंबीयांना चांगली समज दिली.
त्यानंतर हेल्प फाॅर निडिच्या रुग्णवाहिकेतून वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचारासाठी दाखल केले. यासाठी त्यांना भरत संग्रोळी, मंजू कामनी व दशरथ कणबरकर यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, संबंधित असहाय्य वृद्धाला फिट येण्याचा आजार असण्याबरोबरच एकेकाळी त्याची मोठी मालमत्ता होती असे समजते. तसेच ती मालमत्ता हिरावून घेऊन कुटुंबीयांनी आता त्याला वाऱ्यावर टाकल्याचे बोलले जात आहे.