हुककेरी तालुका तालुक्यातील बोरगल या गावात एका बापाने आपल्या तीन मुलींना आणि एका मुलाला विष पाजून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना काल घडली. पत्नीला ब्लॅक फंगस झाला आणि तिचा मृत्यू झाला यानंतर आलेल्या नैराश्यातून त्याची मानसिकता बदलली आणि त्यांनी आपले संपूर्ण कुटुंब संपवले.
ही घटना म्हणजे सरकारी यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनाची कमतरता नवे काय? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. जिल्हा पालकमंत्र्यांनी असे मानसिक खच्चीकरण करून घेऊन जीवन संपवू नका असे सांगून सांत्वन केले मात्र सरकार आणि जिल्हा प्रशासन या कुटुंबाला त्या माजी सैनिकाला आधार देण्यात कमी पडले असे म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे कृत्य केलेले गोपाल हे भारतीय सैन्य दलात सेवेत होते. तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त होऊन ते गावी आले होते. आपल्या तीन एकर मालकीच्या जागेत कष्ट करून त्यांनी बंगलाही बांधण्याचे काम सुरू केलं होतं.
अशा वेळी पत्नी गेली आणि त्यानंतर या संपूर्ण कुटुंबाला मानसिक आधार देण्याची खऱ्या अर्थाने गरज होती. सामाजिक कार्यकर्ते ,गावातील नागरिक आणि इतर नातेवाईकांनी सामाजिक आधार दिला असेल की नाही हे माहीत नाही, मात्र आरोग्य यंत्रणेने वारंवार त्या घरी जाऊन झालेली हानी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले असते तर कदाचित बाप लेकरांची विष प्रश्नाने आत्महत्या झाली नसती. मात्र पत्नीच्या मृत्यूने बिघडलेली मानसिकता संपूर्ण कुटुंबाचा नाश करून गेली आहे.
यापुढे अशा प्रकारे कोणत्याही कुटुंबांनी निर्णय घेऊ नये. यासाठी आता सरकारने प्रशासनाने जागृती करण्याची गरज आहे. एखाद्या कुटुंबात कोरोना किंवा ब्लॅक फंगस सारखा आजार होऊन मोठी हानी झाल्यास त्या कुटुंबाला सावरण्यासाठी वारंवार समुपदेशन आणि इतर अनेक उपाय राबवण्यासाठी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करायला हवे आहेत. यापुढील काळात असे प्रयत्न करण्याची गरज असून तसे प्रयत्न झाल्यास अश्या कुटुंबांची वाताहत रोखता येईल.