बेळगाव शहरातील कोतवाल गल्ली येथे मोठ्या प्रमाणात कचरा विखरून पडला असून मंदिरासमोर असलेल्या या कचऱ्याची तात्काळ उचल केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
एकीकडे सर्वत्र दसऱ्याची धामधूम चालू आहे. सर्व मंदिरे सुसज्जित व रोषणाईने सज्ज केली जात आहेत, तर दुसरीकडे कोतवाल गल्लीतील मंदिरासमोर चक्क कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी हा कचरा साचून पडला असल्यामुळे येथील मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. याखेरीज कचरा आणि घाणीमुळे दुर्गंधीचे वातावरण करण्याबरोबरच डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे सणासुदीच्या दिवसात अशा पद्धतीने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा विखरून पडला असल्याने नागरिकांत तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
तरी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोतवाल गल्ली येथील सदर कचऱ्याची तात्काळ उचल करून परिसर स्वच्छ करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली जात आहे.