रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून ई -केवायसी मोहीम सुरू करण्यात आली असून बेळगाव जिल्ह्यात गेल्या 5 ऑक्टोबरपर्यंत या मोहिमेअंतर्गत 87.01 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक काम रामदुर्ग व बेळगाव तालुक्यात पूर्ण झाले आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी ही केवायसी मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात ही मोहीम 100 टक्के राबविण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना अनुकूल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर मोहिमेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात 87.01 टक्के काम पूर्ण झाले असून यामध्ये गेल्या 5 ऑक्टोबरपर्यंत रामदुर्ग तालुक्यात सर्वाधिक 90.24 टक्के तर बेळगाव तालुक्यात 89.38 टक्के काम झाले आहे.
बेळगाव जिल्ह्यात बीपीएल शिधापत्रिकांची संख्या 10 लाख 58 हजार 995 आहे. त्याचप्रमाणे अंत्योदय पत्रिकांची संख्या 68 हजार 665 आहे. बीपीएल आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांची एकूण सदस्य संख्या 36 लाख 55 हजार 271 आहे. यामध्ये 87.01 टक्के जणांनी ई -केवायसी (बोटाचे ठसे) करून घेतली आहे. ई -केवायसी मोहिमेत रामदुर्ग आणि बेळगाव तालुका आघाडीवर असले तरी अथणी तालुक्यात कामाची गती कमी असून या ठिकाणी 83.81 टक्के काम पूर्ण झाले आहे.
उर्वरित बैलहोंगल तालुक्यात एकूण 90.33 टक्के, चिकोडीमध्ये 87.86 टक्के, गोकाकमध्ये 85.52 टक्के, हुक्केरी तालुक्यात 84.76 टक्के, खानापूरमध्ये 85.37 टक्के, रायबागमध्ये 87.18 टक्के आणि सौंदत्ती तालुक्यात 86.83 टक्के काम पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी दैनंदिन कामाची वेळ वगळून ठराविक वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. सर्व्हर डाऊनची समस्या आणि ज्येष्ठ नागरिक शिधापत्रिकाधारक सदस्यांचे बोटांचे ठसे उमटत नसल्याने कामास विलंब होत असल्याने ई -केवायसीसाठीची मुदत वाढवून देण्यात आली आहे.