राज्य मंत्रिमंडळामध्ये आमदार भालचंद्र जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे. त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते नेहरू उरलेकर यांच्यासह चलवादी समाजाच्या अन्य आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावे, अशी मागणी जिल्हा चलवादी महासभा आणि दलित पँथर यांनी केली आहे.
शहरातील हॉटेल मिलन येथे आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चलवादी महासभेचे अध्यक्ष दुर्गेश मेत्री यांनी ही मागणी केली.
आमदार भालचंद्र जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात यावे. त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते नेहरू उरलेकर यांच्यासह चलवादी समाजाच्या अनेक आमदारांना अद्याप कोणतेही मंत्रिपद देण्यात आलेले नाही.
तेव्हा यावेळी त्यांना मंत्रिपद दिले जावे. सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाने चलवादी अभिवृध्दी निगम मंडळ स्थापन करावे. तसेच आगामी अर्थसंकल्पामध्ये सदर समाजाला 10 टक्के आरक्षण ठेवावे, अशी मागणी मेत्री यांनी केली.
त्याचप्रमाणे येत्या 11 नोव्हेंबर रोजी ओनके ओबव्वा यांची जयंती साजरी करण्याचा आदेश मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सरकारला दिला आहे. याबद्दल यावेळी चलवादी महासभा आणि दलित पॅंथर यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले. पत्रकार परिषदेस चलवादी महासभा आणि दलित पॅंथर संघटनेचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.