दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेवल्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत असून कपडे, आकाश कंदील, सुगंधी उटणे, अत्तर, साबण, तेल, पणत्या, लायटिंगच्या माळा यांच्या खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे.
बेळगावसह सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मागील वर्षी कोरोनामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले असले तरी यंदा कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे खरेदीची धूम दिसत आहे. येत्या 1 नोव्हेंबर रोजी वसुबारस असून तेंव्हापासून दिवाळीला सुरुवात होत असल्यामुळे नागरिकांनी आत्तापासूनच खरेदीला सुरुवात केली आहे.
शहरातील किर्लोस्कर रोड, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रविवार पेठ, कलमठ रोड, रोड शनी मंदिर रोड, बापट गल्ली, हंस टॉकीज रोड, बुरुड गल्ली, पांगुळ गल्ली, भातकांडे गल्ली या शहराच्या मुख्य भागात खरेदीसाठी गर्दी होत आहे. रंगबिरंगी आकाश कंदिलांनी बाजारपेठ सजली आहे. यासोबत मातीच्या पणत्या, सुगंधी उटणे, साबण, अत्तर, तेल यामुळे बाजारपेठेत सर्वत्र सुगंध दरवळत आहे.
मारुती गल्ली येथील श्री लक्ष्मी टाॅय सेंटर येथे दिवाळीसाठी उत्तम दर्जाचे आयुर्वेदिक सुगंधी उटणे, तेल, साबण, अत्तर, परफ्युम्स आदी गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मोती साबणाचा दर 75 ग्रॅमला 35 रुपये आणि 150 ग्रॅमला 60 रुपये इतका आहे. म्हैसूर सॅंडल सेंचुरी साबणाचा दर 100 रुपये आहे.
त्याचप्रमाणे म्हैसूर सॅंडल साबण 35 रुपयांपासून उपलब्ध असून म्हैसूर सॅंडल स्पेशल कोंबो पॅकचा दर 200 रुपये आहे. यावेळी दिवाळीसाठी म्हैसूर सॅंडलचे लव्हेंडर आणि जास्मिन हे नवीन साबण बाजारात आले असल्याची माहिती श्री लक्ष्मी टॉईज सेंटरचे मालक विपुल जाधव यांनी दिली. पुण्याचे आयुर्वेदिक हेमला या सुगंधी उटण्याचे 20 ग्रॅमचे पाऊच 20 रुपयाला तर सॅंडल व मोगरा हे अत्तर 40 रुपये कुपी या दराने आमच्याकडे उपलब्ध आहे, अशी माहितीही जाधव यांनी दिली.