वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने येत्या दिवाळी सणाची संधी कॅश करण्याचा निर्णय घेतला असून दिवाळी निमित्त मंडळाने 50 अतिरिक्त बस गाड्यांचे लांब पल्ल्यासाठी नियोजन केले आहे. त्याप्रमाणे या गाड्यांसाठी परिवहन मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग देखील सुरू केले आहे.
नवरात्र काळात सुट्टीमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे तसेच सौंदत्ती यल्लामा देवी दर्शनासाठी परिवहन मंडळाने अतिरिक्त बस सेवा उपलब्ध केल्यामुळे मंडळाला चांगला महसूल मिळाला आहे.
केवळ सौंदत्ती मार्गावर मंडळाने 1 कोटी 70 लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. परिणामी आता चांगल्या महसूल वाढीसाठी परिवहन मंडळाने दिवाळी सणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी आतापासून 50 अतिरिक्त बसेसची नियोजन करण्यात आले आहे.
बेळगावातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये दक्षिण कर्नाटकातील कर्मचाऱ्यांचा अधिक भरणा आहे. दिवाळीनिमित्त अनेकांनी आत्तापासून आपल्या मूळगावी सणासाठी जाण्यास बसचे आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. या अतिरिक्त बस गाड्यांसाठी परिवहनाच्या ऑनलाईन तिकीट आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दिवाळीच्या काळात प्रवासी संख्या वाढल्यास आणखी अतिरिक्त बसचे नियोजन केले जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेशासाठी अद्याप कोरोना चांचणी अहवाल सक्तीचा असल्यामुळे दिवाळीत त्याचा फटका परिवहन मंडळाच्या महसुलावर जाणार आहे.