भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात कर्नाटक शासनाने सीमाभागातील मराठी भाषिकांची टक्केवारी लपवली आहे त्याविरोधात जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 25 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे असा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मंगळवारी दुपारी शहरातील मराठा मन्दिर सभागृहात दिपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात बेळगाव जिल्ह्यातील मराठी बहुल भागातील आकडेवारी दिलेली नाही यामागे कर्नाटक शासनाचा काय कुटील डाव आहे या विरोधात समितीच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे.
अंदाजे 25 ऑक्टोबर च्या दरम्यान मोर्चाचे नियोजन करायचे असून यासाठी मोर्चाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना एक शिष्टमंडळ भेटणार आहे.
मराठी भाषेत फलक लिहिणे,शासकीय परिपत्रिके मराठीत देणे असे भाषिक अल्पसंख्याकांचे जे अधिकार आहेत त्याची पायमल्ली शासनाकडून होत आहे सर्व अधिकार डावलले जात आहेत त्याविरुद्ध मोर्चा द्वारे एल्गार केला जाणार आहे अशी माहिती मध्यवर्ती सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.
मराठी समाजाचे आराध्य दैवते छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांच्या विरोधात काही कानडी संघटना आक्षेपार्ह लिखाण करत आहेत विनाकारण त्यांचा सोशल मीडियावर अपमान करत आहेत अश्याना सरकारने समज दयावी ते जर आमच्या तावडीत सापडले तर त्यांना आम्ही अद्दल घडवू त्याची जबाबदारी पूर्ण सरकार वर राहील. अश्याना प्रशासनाने जाब विचारावा यासाठी देखील हा मोर्चा काढला जाणार असे मालोजी अष्टेकर यांनी स्पष्ट केलं.
मराठी नेत्यांचा अपमान जाणीवपूर्वक करणे चुकीचे आहे याचीही जबाबदारी सरकारची असेल असा इशारा मोर्चात दिला जाईल. बेळगाव सीमा प्रश्नी योगदान दिलेले कै. बॅरिस्टर नाथ पै यांची 10 ऑक्टोबर जन्मशताब्दी आहे त्यानिमित्ताने मराठा मंदिर येथे 10 रोजी सायंकाळी 4 वाजता आदरांजली वाहिली जाणार आहे आणि नाथ पै यांच्यावर व्याख्यान देखील आयोजित केले जाणार आहे असाही निर्णय बैठकीत झाला.
बरखास्तीचा अधिकार यांना कुणी दिला?
समित्या मधून एकी करण्याचे आवाहन करणारे खानापूर तालूका समितीचे अध्यक्ष माजीआमदार दिगंबर पाटील यांना मध्यवर्ती समिती बरखास्त करा म्हणायचा अधिकार कुणी दिला असा सवाल बैठकी द्वारे विचारण्यात आला आहे.
मध्यवर्ती सीमा प्रश्नी अग्रभागी आहे सातत्याने कार्यरत आहे कधी काम बंद केलेलं आहे का?काम करत नाही का वेगळं काम करत आहे असा प्रश्न उपस्थित करून एकी करा म्हणणाऱ्यांनी आम्ही एकी कुणा सोबत करायची?दुसरी समिती कोणती आहे? ती कुठं कार्यरत आहे त्या समितीच्या सचिव व अध्यक्षांचे नाव सांगा कुणाला जाऊन आम्ही भेटू? असलं मध्यवर्ती समिती खपवून घेणार नाही असा इशारा बैठकी द्वारे दिला गेला.