Friday, January 24, 2025

/

अखेर बुडाची बैठक संपन्न : विकास कामांवर झाली चर्चा

 belgaum

बुडाच्या अध्यक्षपदावरून गुळाप्पा होसमनी यांची उचलबांगडी झाल्यानंतर अखेर आज सोमवारी नूतन अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बुडा बैठक पार पडली. बैठकीत शहरातील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.

बुडाचे माजी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी आणि स्थानिक भाजप आमदारांमधील वितुष्टामुळे यापूर्वी बुडाने बोलाविलेल्या दोन बैठका कोरम अभावी रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र यामुळे विकास कामे रखडल्याने जनक्षोभ निर्माण झाला आणि मोर्चा काढून आंदोलनही छेडण्यात आले.

आता होसमनी यांची उचलबांगडी करून बुडाचे नूतन अध्यक्ष म्हणून संजय बेळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी बुडाची बैठक पार पडली. बैठकीला बेळगाव उत्तर आणि दक्षिणच्या आमदारांसह सर्व सदस्य उपस्थित होते. तथापि काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर हे मात्र बैठकीला गैरहजर होते.

बैठकीत बुडाची कणबर्गी योजना क्र. 61 तसेच विविध रहिवासी योजनांमधील रस्ते, उद्याने आदी विकास कामे आणि शहरातील रखडलेल्या विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. बुडाने निर्माण केलेले कुमारस्वामी ले-आउट अद्याप बेळगाव महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले नाही यासह हॉकी इंडिया असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमची निर्मिती बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

त्याचप्रमाणे रामतीर्थनगर येथील ग्रंथालयाचे हस्तांतरण, बुडाची योजना 11 आदींबाबत ही चर्चा झाली. बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि बुडा सदस्य उपस्थित होते.

एकंदर अखेर बुडा बैठक संपन्न होऊन विविध विकास कामे मार्गी लागणार असल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे बुडाने आता लवकरात लवकर शहरातील सर्वसामान्य गरीब लोकांसाठी घरकुल योजना राबवावी, अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.