दिवसा कडकडून ऊन आणि रात्री थंडी अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या बेळगावच्या नागरिकांना मिळत आहे .ऑक्टोबर महिन्यातील ऑक्टोबरची प्रचंड हिट दिवसभर त्रासदायक ठरत असून संध्याकाळनंतर थंडीत हळुवारपणे वाढ होत असल्यामुळे शहरातील वातावरण बिघडत चालले आहे
.याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसू लागला असून डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे सध्या दिसून येत आहे. खरंतर गेल्या दीड-दोन वर्षांपासून आरोग्याला बाधक असेच वातावरण सर्वत्र आहे
.अशा परिस्थितीत नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असले तरी किरकोळ उपचारांवर नागरिक बरे होत होते. कोरोनाची लागण न झालेल्या व्यक्तींना किरकोळ औषध उपचार पुरेसे ठरले. सध्या ऑक्टोबर हीट आणि थंडी याचा मिलाफ तसेच वेळोवेळी बदलणारे वातावरण याचा मनस्ताप नागरिकांना सोसावा लागत आहे .
सर्दी खोकला ताप व इतर अनेक व्हायरल आजार निर्माण होत असून काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे .नागरिकांनी वेळीच औषधोपचार घेऊन आपली प्रकृती चांगली ठेवण्याची गरज आहे .याकडे लक्ष द्यावे .फॅमिली डॉक्टर कडे वेळोवेळी जाऊन आपले आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन सध्या करण्यात येत आहे.
लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे .जास्त संख्येने मुले शाळेत जमल्यास व्हायरल आजाराचा फटका त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. याकडे खबरदारी म्हणून वेळोवेळी त्यांच्यावर औषधोपचार करावेत तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.