मुंबई कर्नाटकाला कित्तूर कर्नाटक असे म्हणण्यासाठी कॅबिनेटची विशेष बैठक घेऊन योग्य ती व्यवस्था केली जाईल .अशी घोषणा कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी अधिकृतरीत्या केली आहे.
कित्तुर येथे कित्तुर उत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना बसावराज बोम्माई यांनी याची घोषणा केली आहे.
ब्रिटिश काळात मुंबई प्रांताच्या स्थापनेपासून कर्नाटकातील काही भागाला मुंबई कर्नाटक असे संबोधण्याची पूर्वापार पद्धत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रशी जोडल्या गेलेल्या सीमा भागाला मुंबई कर्नाटक रिजन असे म्हटले जात होते. मात्र आता कर्नाटक सरकार हा भाग कित्तूर कर्नाटक म्हणून संबोधण्याची अधिकृत व्यवस्था करत आहे. या प्रकरणी यापूर्वीच घोषणा झाली होती. मात्र ती अधिकृत नव्हती.
शनिवारी कित्तूर उत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी यासंदर्भात थेट चर्चा केली असून, कित्तूर कर्नाटक असा उल्लेख होण्याच्या दृष्टीने कॅबिनेट बैठकीत चर्चा केली जाईल. असे सांगितले आहे.
कित्तुर उत्सवाचे उद्घाटन केलेल्या मुख्यमंत्र्याला अपशकुन होतो अशी एक अंधश्रद्धा असल्याने आपण या उद्घाटनाला का आला? असा प्रश्न काही पत्रकारांनी केला असता, या प्रकारच्या अंधश्रद्धा आपण पाळत नाही. आपण जे काही आहे ते कित्तूर राणी चन्नम्मा मुळे आहे. त्यामुळे हा अपशकुन जर असेल तर तो माझ्यापासून दूर होणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे .
यापूर्वी काही वेळा मुख्यमंत्री पदावर पाणी सोडण्याची वेळ कित्तूर उत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांच्या वाट्याला आली होती. त्यामुळे असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता. मात्र आपल्याला या प्रकारचा कोणताही धोका होणार नाही. कित्तूर राणी चन्नम्माच्या आशीर्वादाने आपण अधिक कार्यक्षम सरकार चालवणार असल्याचे बसवराज बोम्माई यांनी म्हटले आहे.