बेळगावच्या वास्तू शिल्पकार प्राजक्ता मुकुंद देशपांडे या बहुदा सर्वात तरुण भारतीय वास्तू शिल्पकार आहेत ज्यांची युएस /आयसीओएमओएस आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत मेटलँड फ्लोरिडा येथील कला आणि इतिहास संग्रहालयासाठी निवड झाली आहे.
यासंदर्भात बोलताना प्राजक्ता देशपांडे म्हणाल्या, 1965 साली स्थापण्यात आलेली इंटरनॅशनल कौन्सिल ऑन माॅन्युमेंट्स अँड साइट्स (आयसीओएमओएस) ही बिगर सरकारी संघटना आहे. जगभरातील सांस्कृतिक वारसा जपण्याच्या कार्याला वाहून घेतलेल्या या संघटनेकडून त्यासाठी संशोधन केले जाते. सिद्धांत मांडले जातात. यासाठी वैज्ञानिक तंत्र आणि कार्यपद्धती अवलंबली जाते. आयसीओएमओएस संघटनेच्या जगातील 151 देशांमध्ये शाखा आहेत. अमेरिका (युएस) आणि आयसीओएमओएस संयुक्तरीत्या 1984 पासून आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण कार्यक्रम राबवत आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनामागील मूळ उद्देश विविध देशांमध्ये संवर्धन ज्ञान आणि तज्ञांची देवाण घेवाण व्हावी हा आहे, अशी माहिती प्राजक्ता यांनी दिली.
खरं तर आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण कार्यक्रमासाठी 2020 मध्येच माझी निवड झाली होती, मात्र कोरोनामुळे तो कार्यक्रम रद्द झाला आणि 2021 साठी माझी निवड झाली. मेटलँड फ्लोरिडा येथील कला आणि इतिहास संग्रहालयाने माझी निवड केली आहे. या संग्रहालयाकडून 20 व्या शतकातील डेको -मायान या भव्य ऐतिहासिक इमारतीच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले जात असून या कामात त्यांना माझे सहाय्य हवे आहे. माझे तेथील काम 10 आठवड्याचे असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राजक्ता देशपांडे यांनी केएलएस संस्थेच्या जीआयटी कॉलेजमधून वास्तु शिल्पकला पदवी संपादन केली आहे. त्यानंतर मुंबई बाहेर असणारे संरक्षक वास्तुशिल्पकार विकास दिलवारी यांच्यासमवेत त्यांनी 2 वर्षे वास्तू शिल्पकार म्हणून कामाचा अनुभव घेतला आहे. वास्तुकलेचे अधिक ज्ञान मिळविण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कमधून प्राजक्ता यांनी मास्टर्स पदवी घेतली आहे. यासाठी त्यांना चार्ल्स वॉलेस इंडिया ट्रस्टची संपूर्ण शिष्यवृत्ती मिळाली होती. इंग्लंडहून परतल्यानंतर बेळगावमध्ये त्यांनी वास्तू शिल्पकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे.
बेळगावमध्ये जुन्या काळातील अनेक घरे -इमारती आहेत. जुना वारसा सांगणाऱ्या या वास्तूंचे जतन झाले पाहिजे. यासाठी संबंधित घरमालकांना प्रोत्साहित केले गेले पाहिजे, जनजागृती केली पाहिजे. मी स्वतः जुन्या काळातील घरांच्या घरमालकांना कमीत कमी साधनसंपत्तीच्या सहाय्याने त्यांच्या घराची दुरुस्ती करून देण्यास तयार आहे. कारण सध्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या युगात शहरातील सुंदर जुनी घरे आणि इमारती नामशेष होत आहेत.
त्यांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे असे सांगून मी माझ्या चार मित्रांसह ‘हेरिटेज ऑफ बेलगाम’ हे इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज देखील चालवत आहे. बेळगावच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची सर्वांना माहिती व्हावी आणि आपल्या ऐतिहासिक मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांना संघटित करावे हा हे पेज चालवण्या मागचा मूळ उद्देश आहे, असेही प्राजक्ता मुकुंद देशपांडे यांनी स्पष्ट केले.