गेल्या पाच महिन्यापासून मयत व्यक्तीच्या नावावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न बेळगावात सुरू झाला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात काहीही शक्य आहे, येथे मृत व्यक्ति तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक महिने, अनेक वर्षे जिवंत राहते. याचा प्रत्यय सध्या बेळगावात येत आहे. कांही महिन्यांपूर्वी निधन पावलेल्या व्यक्तीच्या नांवे त्याच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
निदर्शनास आलेल्या बाबीनुसार बेळगाव जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष डी. एल. कुलकर्णी यांचे गेल्या 18 मे 2021 रोजी निधन झाले. टीव्ही सेंटर येथील रहिवासी असणारे कुलकर्णी हे प्रथितयश कंत्राटदार होते. गेल्या बुधवारी सकाळपासून 25 हून अधिक जणांना मयत डी. एल. कुलकर्णी यांच्या नांवे फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. द्यामनगौडा कुलकर्णी या नांवाने सुरु करण्यात आलेल्या फेसबुक अकाउंटवरून आलेली रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर खरा खेळ सुरु झाला.
कै. डी. एल. कुलकर्णी यांच्या नांवे त्यांच्या मित्रांच्या मेसेंजर वर ‘हाय’ म्हणून मेसेज सुरू झाले. कसे आहात?, कुठे आहात? अशी विचारणा होऊ लागली. थोड्यावेळात तुमचा गुगल पे किंवा फोन पे आहे का? अशी विचारणा होऊ लागली. मित्राकडून ‘आहे’ असे उत्तर मिळताच, मला तातडीने 10 हजार रुपयांची गरज आहे. सकाळी 10 नंतर बँक सुरू झाल्यावर तुम्हाला पैसे परत करतो.
तुम्ही सध्या 8697097267 या आपल्या मित्राच्या खात्यावर गुगल पे करा अशा विनंतीचे मेसेज सुरू झाले. या प्रकाराने सावध झालेल्या अनेकांनी पाच महिन्यांपूर्वीच डी. एल. कुलकर्णी वारले आहेत. आता तुम्ही कुठून उगवलात? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सायबर गुन्हेगारीत मुरलेल्या त्या अज्ञात गुन्हेगारांनी दुसरे गिऱ्हाईक शोधणे सुरू केले आहे.