Saturday, January 4, 2025

/

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 35 लाखाची मदत

 belgaum

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बडाल अंकलगी (ता. बेळगाव) येथील घर कोसळून मयत झालेल्या कुटुंबातील भिमाप्पा खनगावी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण करून त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच प्रत्येक मृतासाठी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करताना आज गुरुवारी सकाळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सहा मृतांसाठी सरकारतर्फे एकूण 30 लाखाचे धनादेश भीमाप्पा खनगावी यांच्याकडे सुपूर्द केले.

त्याचप्रमाणे काशव्वा होळप्पणावर या मयत मुलीच्या कुटुंबियांना 5 लाखाचा धनादेश दिला. धनादेश स्वीकारतेवेळी भीमप्पा खनगावी यांना शोक अनावर झाला होता.अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 6 जणांसह अन्य एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी रात्री 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास बडाल अंकलगी (ता. बेळगाव) येथे घडली. मृतांमध्ये एक पुरुष, तीन महिला आणि तीन मुलींचा समावेश आहे.

या दुर्घटनेबाबतची माहिती मिळताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तात्काळ मृतांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे वारसांना नुकसानभरपाईची रक्कम घोषित केली होती. भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत भिमाप्पा खनगावी यांच्या कुटुंबातील गंगवा भीमा खनगावी (वय 50), सत्यव्वा अर्जुन खनगावी (वय 45), पूजा अर्जुन खनगावी (वय 8), सविता भिमाप्पा खनगावी (वय 28), लक्ष्मी अर्जुन खनगावी (वय 15), व अर्जुन हनुमंत खनगावी (वय 45, सर्व रा. बडाल अंकलगी, ता. बेळगाव) यांच्यासह त्याच गावातील काशव्वा विठ्ठल होळेप्पणावर (वय 8) या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या सर्व मृतांच्या वारसांना आज सरकारच्यावतीने जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज गुरुवारी सकाळी एकूण 35 लाख रुपयांचे धनादेश वितरित केले. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 2 लाख याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.Karjol visited anklagi

जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज सकाळी बडाल अंकलगी येथे दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मृतांच्या वारसांना धनादेशाचे वितरण केले. यावेळी त्यांनी विधिलिखित कोणाला टळलेले नाही, मन घट्ट करा असे सांगून मृतांच्या वारसांचे सांत्वन केले. यावेळी धनादेश स्वीकारताना स्वतःच्या कुटुंबातील सहा जणांना गमावलेल्या भिमाप्पा खनगावी याला शोक अनावर झाला आणि रडू कोसळले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्याचा खांदा थोपटवून त्याचे सांत्वन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, बेळगावचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते .

धनादेश वितरण केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सदर दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि अतिशय दुःखदायक असल्याचे सांगितले. मृतांच्या वारसांचे दुःख आपण कमी करू शकत नाही, तथापि त्यांना सहाय्य करू शकतो. यासाठीच सरकारकडून प्रत्येक मृत व्यक्तीला 5 लाख रुपये याप्रमाणे 35 लाख रुपयांचे धनादेश नुकसानभरपाईच्या स्वरूपात वितरित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी देखील आपल्या पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येक मृतामागे 2 लाख रुपये याप्रमाणे 14 लाख रुपये परिहार धन म्हणून मंजूर केले आहे. याव्यतिरिक्त मृतांमध्ये ज्या तीन मुली आहेत त्या मुलींच्या नातलगांना सरकारच्या बालकल्याण खात्याकडून प्रत्येकी 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. त्याचप्रमाणे खनगावी यांचे घर बांधण्यासाठी 5 लाख रुपये सरकारकडून दिले जातील, असे जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टीमुळे घरे, भिंती कोसळण्याच्या अशा धोकादायक घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या असून ज्या गावांमधील घरे धोकादायक अवस्थेत आहेत त्यांची पाहणी करून त्या घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे अशी सूचना तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी आणि पीडिओंना देण्यात आली आहे. मृत्यूनंतर नुकसानभरपाई देण्यापेक्षा नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजना करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असेही जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.