कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून पैसे उकळत असलेल्या तक्रारींवरून एसीबी अधिकाऱ्यांनी धारवाड येथील अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या
व्यवस्थापकाच्या घरावर व कार्यालयावर छापा मारून ५ लाखांहून अधिक रक्कम जप्त केली.ही सर्वात मोठी धाड ठरली आहे.
धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयाचे व्यवस्थापक शिवशंकर हिरेमठ यांच्या कार्यालयावर आणि उळवी चन्नबसवेश्वर नगरातील घरावर एसीबी अधिकाऱ्यांनी शनिवारी छापेमारी केली.
हिरेमठ यांच्याबाबत जनतेकडून कामांसाठी सतत लाचेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी एसीबीला प्राप्त झाल्या होत्या.या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली होती.
त्यावरून गदग आणि धारवाड येथील एसीबीच्या संयुक्त पथकाने हे छापे मारले. यात शिवशंकर हिरेमठ यांच्या घरी ३ लाख रुपयांहून अधिक बेहिशेबी रक्कम आढळून आली तर कार्यालयाला आणलेल्या कारमध्ये १ लाख २५ हजार रुपयांहून अधिक अशी एकूण ५ लाख रुपयांहून अधिक रक्कम आढळली.
ती एसीबी अधिकाऱ्यांनी जप्त केल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत एसीबी अधिकाऱ्यांनी हिरेमठ यांचे घर व कार्यालयात ठाण मांडले होते. छाप्यात आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी त्यांनी चालविली होती.या धाडीने खळबळ माजली आहे.