मातीतील कुस्तीच्या संवर्धनासाठी आणि युवा पिढीमध्ये कुस्ती खेळाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने मुचंडी (ता. बेळगाव) येथील आंतरराष्ट्रीय मल्ल पै. अतुल शिरोले यांनी आपल्या घरी श्री गणेशोत्सवाचा देखावा साकारला असून या देखाव्यातील बेळगावच्या एतिहासिक आनंदवाडी कुस्ती आखाड्याची छोटीशी प्रतिकृती सर्वांच्या कौतुकाचा विषय झाली आहे.
मुचंडी येथील युवा आंतरराष्ट्रीय मल्ल पै. अतुल सुरेश शिरोले यांनी स्थानिक कुस्ती मैदानांसह राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धांमध्ये मोठा नांवलौकिक मिळविला आहे. शिरोले कुटुंबाला अतुल यांचे आजोबा कै. पै. गुंडू शिरोले यांच्यापासून कुस्तीची परंपरा आहे.
अतुल यांचे वडील पै. सुरेश शिरोले हे देखील एकेकाळचे नावाजलेले पैलवान आहेत. कुस्तीवर असलेल्या नितांत प्रेमातून तसेच या मर्दानी खेळाचे संवर्धन व्हावे, बेळगावची कुस्ती परंपरा लोकांना कळावी या उद्देशाने अतुल यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरच्या श्री गणेशासमोर आनंदवाडी कुस्ती मैदानाचा छोटासा देखावा सादर केला आहे.
शिरोली कुटुंबीयांची श्री गणेश मूर्ती देखील वैशिष्ट्यपूर्ण असून बजरंगबली हनुमानाचे आयुध असणाऱ्या गदेवर विराजमान झालेली हिंद केसरी पैलवानाच्या रूपातील हि ‘श्री’ची मूर्ती सार्यांचे लक्ष वेधून घेते.
कुस्ती आखाडाला जिवंतपणा यावा यासाठी त्यामध्ये पैलवानांच्या कुस्त्या दाखविण्यात आल्या आहेत. तसेच समोरच्या दर्शनीय ठिकाणी पै. अतुल शिरोले यांनी गाजवलेल्या कुस्ती मैदानांचा माहितीसह सचित्र आढावा सादर करण्यात आला आहे. सदर देखावा सध्या कौतुकाचा विषय झाला आहे.