जागतिक अँटी रॅबिज दिनानिमित्त पशु संगोपन खात्याकडून जिल्ह्यातील विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये एकूण 970 पाळीव कुत्र्यांचे अँटी रॅबीज अर्थात रॅबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
जागतिक अँटी रॅबीज दिनानिमित्त मंगळवारी पशु संगोपन खात्यातर्फे जिल्ह्यामध्ये पाळीव कुत्र्यांसाठी मोफत रॅबीज रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यास संबंधित व्यक्ती असो किंवा प्राणी त्यांना रॅबीजची लागण होते.
रॅबीज हा रोग जीवघेणा असल्याने पाळीव कुत्र्यांना लस टोचून घेणे महत्त्वाचे असते. तथापि अनेक जण आपल्या पाळीव कुत्र्यांना रॅबीज लस टोचून घेण्याकडे दुर्लक्ष करतात. यासाठी मंगळवारी जागतिक रॅबीज दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील विविध पशुवैद्यकीय दवाखान्यात सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पाळीव कुत्र्यांना मोफत रॅबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली.
जिल्ह्यातील बेळगावसह अथणी, चिकोडी, रायबाग, गोकाक, संकेश्वर, मुडलगी, निपाणी, कागवाड, हुकेरी आदी तालुक्यात ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात एकूण 9080 पाळीव कुत्री आहेत.
बेळगाव मुख्य पशुवैद्यकीय दवाखान्यासह वडगाव, महांतेशनगर, अनगोळ हिरेबागेवाडी, सांबरा, उचगाव, के. के. कोप्प, हुदली, कडोली, बेळगुंदी, आंबेवाडी, संतीबस्तवाड, येळ्ळूर, नंदीहळ्ळी, हलगा, निलजी, किणये आदी ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कुत्र्यांना मोफत लस देण्यात आल्याची माहिती पशु संगोपन खात्याचे संचालक डॉ. अशोक कोळा यांनी दिली.