अर्ध्याहून अधिक पथदीप बंदावस्थेत असल्यामुळे शहराच्या निवासी आणि व्यापारी प्रदेशातील बहुतांश रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असून हे रस्ते गुन्हेगारीसाठी ‘कुरण’ ठरत आहेत.
पथदीप बंद असल्यामुळे रस्त्यावर पसरलेल्या अंधाराचा फायदा घेऊन वाटमारीचा प्रयत्न झाल्याची घटना काल रविवारी रात्री केएलई हॉस्पिटलनजीक घडली. मिळालेल्या माहितीनुसार, केएलईचा एक वैद्यकीय कर्मचारी काल रात्री आपल्या रात्रपाळीच्या कामासाठी जात होता. पथदीप बंद असल्यामुळे अंधाऱ्या रस्त्यावरून चालत निघालेल्या या कर्मचाऱ्याला केएफसी ओलांडल्यानंतर तोंडावर बुरखा असलेल्या एका व्यक्तीने अडवून पैशाची मागणी केली. कर्मचाऱ्याने पैसे देण्यास नकार देताच त्या अज्ञाताने चाकूने त्याच्यावर हल्ला करून पोबारा केला. या हल्ल्यात संबंधित वैद्यकीय कर्मचारी जखमी होऊन रक्तबंबाळ झाला होता. कृष्णदेवराय सर्कल अर्थात कोल्हापूर कत्रीपासून केएलई हॉस्पिटलपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे हा प्रकार घडला.
ही फक्त एकच घटना आहे जी उघडकीस आली, अन्यथा एकंदर परिस्थिती पाहता असे प्रकार शहराच्या अन्य भागात ही घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस आणि महापालिका कांहीच हालचाल करताना दिसत नाही. गेल्या 3 -4 वर्षांपासून शहरातील बंद पथदीपांची समस्या ही प्रमुख नागरी समस्या बनली आहे. तथापि दुर्देवाने कोणालाच ही समस्या निकालात काढण्यासाठी तसदी घ्यावी सारखी वाटत नाही.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने वीज बिल अदा केले नसल्यामुळे हेस्काॅमने त्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. महानगरपालिका व्याप्तीतील बहुतांश जुने पथदीप काढण्यात आले आहेत किंवा स्मार्ट सिटीच्या कामामुळे ते तुटले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ते नवे होत असले तरी नवे पथदीप मात्र बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बहुतांश पथदीप बंद असण्यास स्मार्ट सिटी लिमिटेडची विकास कामेच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.