मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासह बेळगाव सीमाभागावर हक्क सांगण्यासाठी हलगा -बस्तवाड येथे सुवर्ण विधानसौधची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरवणे अवघड जाऊ लागल्यामुळे विविध सरकारी कार्यालयांना या इमारतीचा ताबा देण्यास सुरुवात झाली असून आता साखर आयुक्तालय या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
बेळगाव सुवर्ण विधानसौध इमारतीवर दरवर्षी निष्कारण कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या पैशाचा सदुपयोग व्हावा यासाठी सुवर्ण सौध येथे विविध सरकारी कार्यालयांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव असून याचाच भाग म्हणून साखर आयुक्तालय या ठिकाणी स्थलांतरित करण्याची तयारी सुरू झाली आहे. सुवर्ण विधानसौध येथे केवळ वर्षातून एकदा हिवाळी अधिवेशन भरविले जाते आणि उर्वरित काळात या इमारतीच्या देखभालीवर मोठा खर्च होत असतो. यासाठी सुवर्णसौध इमारतीचा नियमित वापर व्हावा याउद्देशाने अलीकडे बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुवर्ण विधान सौधमध्ये विविध कार्यालय स्थलांतरित करण्याचा विषय गंभीरपणे घेतला आहे.
बेळगावातील विविध संघटनांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सुवर्ण सौधला योग्य स्वरूप देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्याचाच भाग म्हणून आता साखर आयुक्तालय या ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू आहे. सुवर्ण सौध येथे साखर आयुक्तालय व्हावे अशी शेतकरी संघटनेसह ऊस उत्पादकांची देखील मागणी आहे.
उसाला दर, कारखान्यांची थकबाकी आणि संशोधन आदी विषय या विभागाच्या अखत्यारित येत असल्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याची मदत मिळणार आहे. यासाठीच साखर आयुक्तालय सुवर्ण विधानसौधमध्ये हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.