Saturday, April 27, 2024

/

जाधवनगरातील नांवे मतदार यादीतून गायब : तीव्र संताप

 belgaum

गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान केलेल्या जाधवनगर येथील सुमारे 250 मतदारांपैकी 150 मतदारांची नांवे मतदार यादीतून गायब असल्याचा प्रकार आज सकाळी महापालिका निवडणुकीच्या मतदानाप्रसंगी उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खुद्द माजी आमदार कै. नारायण तरळे यांच्यासह अन्य काहींच्या संपूर्ण कुटुंबांचीच नांवे गहाळ करण्यात आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीच्या आजच्या मतदानप्रसंगी प्रभाग क्र. 32 मधील जाधवनगर येथील सुमारे 250 मतदारांपैकी 150 मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच याबाबत तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्यामुळे संबंधित मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून गेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील त्यांनी केलेले मतदान लक्षात घेऊन तसेच निवडणूक ओळखपत्र तपासून आपल्याला मतदान करण्यास दिले जावे अशी मागणी संबंधित मतदारांनी केली आहे. त्याचप्रमाणे काहींनी तब्बल 150 नांवे मतदार यादीतून गायब असल्याने याचा परिणाम निश्चितच निवडणूक निकालावर होणार असल्यामुळे जोपर्यंत संबंधित मतदारांना मतदानाचा हक्क मिळत नाही तोपर्यंत या प्रभागाचा निकाल राखून ठेवावा, अशी मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्र. 32 मध्ये येणाऱ्या जाधवनगर या वसाहतीला ज्यांच्यामुळे जाधवनगर हे नांव मिळाले त्या जाधव घराण्यातील सदस्यांचीच नांवे मतदार यादीतून गायब आहेत. विशेष म्हणजे खुद्द माजी आमदार दिवंगत नारायणराव तरळे आणि माजी लोकप्रतिनिधी नीलिमा पावशे यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची नांवे गहाळ करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट रामलिंग हरगुडे, बांधकाम व्यवसायिक नुरानी -भावनगरी, व्यवसायिक वेमुलकर, ॲड. ममदापुर आदी आदी प्रतिष्ठित नागरिकांच्या घरातील एखाद-दुसऱ्याचे वगळता इतर सर्वांची नांवे मतदार यादीतून गायब आहेत. हा सर्व प्रकार संबंधित मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी गेले असता उघडकीस आला. त्यामुळे समस्त जाधवनगरवासीयांमध्ये एकच खळबळ उडाली आणि त्यांनी मतदान केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्याचप्रमाणे म. ए. समितीचे रणजीत चव्हाण -पाटील, मदन बामणे, मनोज पावशे आदी मंडळी मतदान केंद्राच्या ठिकाणी हजर झाली. तथापि त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे समजते. यावेळी मतदान केंद्राबाहेर एकच गर्दी झाल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.Voter list names

 belgaum

अवघ्या चार महिन्यापूर्वी झालेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीप्रसंगी जाधवनगर येथील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तेंव्हा नेमक्या महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाप्रसंगी त्यांची नांवे मतदार यादीतून कशी गायब होतात? असा संतप्त सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे मतदार यादीतून गहाळ करण्यात आलेल्या नावांपैकी बहुतांश जण मराठी भाषिक असल्यामुळे हा प्रकार जाणून बुजून करण्यात आला असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात बोलताना समिती नेते मदन बामणे म्हणाले की, सदर प्रभागातून गेल्यावेळी मराठी भाषिक उमेदवार नीलिमा पावशे यांना फक्त 5 मताने पराभव पत्करावा लागला होता. फक्त 5 मतांनी त्यावेळी निकाल फिरला होता. आता तर मराठी भाषिकांची किमान 100 मते तरी गहाळ आहेत, तर मग याचा परिणाम काय होईल? हे शासनाने गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. प्रभात पुनर्रचना करून एक तर प्रभागांची तोडफोड करण्यात आली आहे. आता मराठी भाषिकांची नांवे गहाळ करून मतदान कमी केले जात आहे. हे सर्व पाहता मराठी भाषिक महापालिकेवर निवडून जाऊ नयेत यासाठीच मतदारांची नांवे कमी केल्याची शंका येऊ लागली आहे, असे बामणे म्हणाले.

जाधवनगर येथील मतदार यादीतील नांवे गहाळ होण्याच्या प्रकाराची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी त्वरित संबंधित मतदान केंद्राच्या ठिकाणी दाखल होऊन तेथे जमा झालेल्या जाधवनगरवासीयांची भेट घेतली. यावेळी मनोज पावशे यांच्यासह इतरांनी घडलेला प्रकार आमदारांच्या कानावर घातला. तेंव्हा आमदार बेनके यांनी प्रभाग क्रमांक 34 व अन्य ठिकाणीही असे प्रकार घडले आहेत. प्रभाग क्रमांक 34 मध्ये तर तब्बल 800 नांवे मतदार यादीतून गायब आहेत. यासंदर्भात आपण कालच मुख्य निवडणुक अधिकारी व जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरणही दिले आहे. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबवता येणार नाही. तुम्ही या संदर्भात न्यायालयात दाद मागू शकता असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार आपण न्यायालयात दाद मागून निवडणूक निकालावर स्थगिती आणू शकतो. याशिवाय आता दुसरा पर्याय नाही, असे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सांगितले. याप्रसंगी जाधवनगर येथील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.