वाल्मिकी समाजातील राजे राजा वीर मदकरी नायक हे कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील शेवटचे शासक होते.त्यांचे नाव बेळगावातील राणी पार्वतीदेवी चौकाला देण्याचा प्रयत्न झाला.दरम्यान मदकरी नायक यांच्याबद्दल बेळगावात नामकरण करून अनेक वर्षे या चौकाला ज्यांचे नाव होते त्या राणी पार्वतीदेवी यांचा अपमान कशासाठी? असा प्रश्न गंभीर बनला आहे.
आर पी डी कॉलेज, आर पी डी कॉलेज रोड आणि आर पी डी सर्कल ही नावे बेळगावात प्रचलित आहेत. राणी पार्वतीदेवी यांच्या नावे कोकणात कॉलेज सुरू होते. ते काही कारणांनी बेळगावात स्थलांतरित करावे लागले. या गोष्टीला इतिहास आहे. असे असताना त्यांचे नाव बदलण्याचा अनधिकृत कारभार कुणी सुरू केला हा प्रश्न विचारला जात आहे.
मदकरी नायक यांचा इतिहास कर्नाटकातील चित्रदुर्गशी संबंधित आहे. एक योद्धा म्हणून फक्त कर्नाटक नव्हे तर देशाला त्यांचा गौरव असायला हवा पण इतिहासकालीन संदर्भ नसताना बेळगावकरांच्या माथी त्यांचे नाव मारणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
हैदर अलीने केलेल्या हल्ल्यात नायकने चित्रदुर्ग किल्ला गमावला. अलीचा मुलगा टिपू सुलतानने त्याचा विश्वासघात केला आणि १७९९ मध्ये ठार मारले. राजा वीर मदकरी नायक हा चित्रदुर्गच्या नायकापैकी अत्यंत प्रबळ राजापैकी एक होता. १२ व्या वर्षी हा राजा सिंहासनावर बसला. हैदरअलीने चित्रदुर्गला वेढा देऊन त्याचा पराभव केला. त्यामुळे मदकरीच्या राजवटीबरोबर चित्रदुर्गच्या नायकांचा वंश संपुष्टात आला. त्यांच्याबद्दल गौरव असलेल्या विशिष्ट समाजाने बेळगावात त्यांच्याबद्दल नामकरण व्हावे हा अट्टाहास सोडावा अशी मागणी होत आहे.
मदकरी नायक यांच्या काळात प्राणपणाने लढलेल्या ओनके ओब्बवाचे आजही स्मरण होते.हैदरअलीच्या सैनिकांनी चित्रदुर्ग किल्ल्यात गुप्त मार्गाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पहारेकऱ्याची पत्नी ओनके ओब्बव्वाने मुसळाने अनेक शत्रू सैनिकांना ठार केले. चित्रदुर्ग किल्ल्याच्या पश्चिमेला ‘ओब्बव्वाची खिंड’ पहावयास मिळते. हा इतिहास लक्षात घेता नायक यांच्या नावाला आणि इतिहासाला बट्टा लागेल असे कोणतेही कृत्य करू नये हीच गरज आहे.